नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच कुंदाताईंची राजकीय वाटचाल यशस्वी होईल – आ. लक्ष्मण जगताप

नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच कुंदाताईंची राजकीय वाटचाल यशस्वी होईल - आ. लक्ष्मण जगताप
  • कोविड काळात कुंदाताईंनी नागरिकांसाठी जीवाचे रान केले – हभप ऋषिकेश महाराज चोरगे
  • कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आ. जगताप याहस्ते उदघाटन

पिंपरी : उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कुंदाताई यांनी पिंपळे सौदागर परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने त्यांचे सामजिक कार्य आजही सुरूच आहे. या कामांमुळेच सौदागरवासीयांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे. नागरिकांच्या पाठिंब्यामुळे सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रातील त्यांची वाटचाल सोपी होईल, अशा शब्दात चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी कुंदाताई भिसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पिंपळे सौदागर येथे कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पी. के. स्कूलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सर्वप्रथम चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका आरतीताई चोंधे, हभप ऋषिकेश महाराज चोरगे, उद्योजक वसंत काटे, सामाजिक कार्यकर्ते संजयआबा भिसे, अनिताताई भिसे, उद्योजक जयनाथ काटे, स्वी. सदस्य संदीप नखाते, पी. के. स्कूलचे जग्गनाथ काटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश वाणी, राजेंद्र जयस्वाल, मल्हारी कुटे, बाळासाहेब काटे, आण्णा शेलार, सुरेश कुंजीर, चंद्रकांत मुरकुटे, शेखर कुटे, सागर बिरारी विविध सोसायटीचे चेअरमन आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी कुंदाताईना भेटून शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक करताना नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत निसटता पराभव होऊनदेखील त्याची तमा न बाळगता कुंदाताईंनी मोठ्या चिकाटीने पुन्हा समाजकार्याचे शिवधनुष्य पेलले. कोविड काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची राज्यपालांनी दखल घेतली. त्यांच्या कार्याचा सन्मान केला. नगरसेवक नसताना देखील त्या उन्नतीच्या माध्यमातून आमच्या खांद्याला खांदा लावून नेटाने काम करतात. त्या २०२२ च्या महापालिका निवडणुकीत पुन्हा जोमाने उभ्या राहणार आहेत. त्यांना तुमची साथ हवी.

हभप ऋषिकेश महाराज चोरगे म्हणाले, कुंदाताई व भिसे परिवाराने घरोघरी सांप्रदायाचा प्रसार केला. त्या येथील भगिनींचा आवाज आहेत. त्यांच्यात आदर्श आणि खंबीर नेतृत्वाची चुणूक दिसते. उन्नती फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी कामाचा वटवृक्ष उभा केला आहे. आधी केले मग सांगितले. कोणताही राजकारणी व्यक्ती आधी आश्वासने देतो. परंतु, कुंदाताईंनी तसे न करता आधी लोकांची कामे केली. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली. नागरिकांनी त्याची आठवण ठेवावी. यंदा महापालिका निवडणुकीत त्यांच्या मागे उभे रहा, त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणा व महापालिकेत पाठवा. पिंपळे सौदागरसाठी त्या याहीपेक्षा उत्तुंग कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना कोविड प्रतिबंधक बुस्टर डोसच्या टोकनचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. परिसरातील सोसायटीला टँकरमुक्तीसाठी बोअरवेल आणि नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास अ‍ॅम्ब्युलन्स योजनेचे लोकार्पण करण्यात आले. सोसायटी व कॉलनीमध्ये सोलर विद्युत पुरवठा, महिलांना स्वावलंबी बनविण्याकरिता बचत गटांना व्यवसायपर अनुदान देण्यात आले. ग्रीन पिंपळे सौदागरसाठी ‘ऑक्सिजनयुक्त’ तीन हजार रोपांचे वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला.

”कुंदाताई तुम आगे बढो; हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ तासेच उच्चभ्रू वसाहतीतील राहिवाश्यानी परिसर दणाणून सोडला. कुंदाताई व त्यांच्या कार्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नागरिकांचे सामाजिक कार्यकर्ते विजय भिसे यांनी मनपूर्वक आभार मानले.