काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती.
काँग्रेस पक्षातून पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार ठरणार, याबाबतचा घोळ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अखेर उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र उमेदवारी कधी जाहीर होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे. दरम्यान, प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाली.
काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतरही नावावर एकमत होत नसल्यामुळे आणि नवनवीन नावे पुढे येत असल्यामुळे उमेदवारीबाबतचा घोळ वाढत आहे. त्यामुळे आता दिल्लीतूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दिल्लीतूनच निर्णय होणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आघाडी झालेली आहे. जिल्ह्य़ातील पुण्यासह मावळ, शिरूर, बारामती या लोकसभा मतदारसंघापैकी केवळ पुण्यातील उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू झाला आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचारात सहकार्य केले जात नसल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सांगलीचे आमदार डॉ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार,आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने शुक्रवारी तातडीची बैठक झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांना प्रचारासंबंधी काही सूचना करण्यात आल्या.