महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा :फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम
पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच ‘शाल्मली’ वार्षिक अंकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्था, सातारा च्या सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते.
त्याप्रसंगी डॉ. प्रतिभा गायकवाड म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्या अंतर्गत कलागुणांचा विकास करणे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय ही क्रमिक पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच अवांतर साहित्य वाचण्यासाठी प्रेरित करतात, त्याद्वारेच विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळते, यातून विद्यार्थ्यांमधील भावी लेखक, साहित्यिक घडत जातात.”
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “महाविद्यालयाचा ‘शाल्मली’ हा वार्षिक अंक विद्यार्थ्यांच्या शब्दसुमनांचा अक्षर ठेवा आहे. कथा, कविता, ललितलेखन, वैचारिक लेखन इत्यादी साहित्याची निर्मिती विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. त्यातील दर्जेदार साहित्याला शाल्मली या वार्षिक अंकातून प्रकाशित केले जाते.”
‘शाल्मली’ या वार्षिक अंकाच्या संपादक डॉ. वैशाली खेडकर यांनी या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या वेळी कला व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. माधव सरोदे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. शुभदा लोंढे, डॉ. दत्तात्रय हिंगणे, कार्यालय प्रमुख राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते.