
मुंबई, दि. ६ : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला २१०० रुपयांची वाट पाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (५ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरेसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत २१०० रुपये कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे.
अनिल परब यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा मुद्दा सभागृहात मांडला. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांचे एकत्र पैसे देण्यात आले आणि निवडणुका पार पडल्यावर निकषात बसत नसल्याचे कारण देत महिलांना अपात्र ठरवण्याचे काम सुरू आहे.
तसेच २१०० रुपये कधीपासून देणार, हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही? असे प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले. आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच विरोधक त्यावर टीका करीत आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी अडीच कोटींहून अधिक महिला लाभार्थीसाठी येतील, अशी साधारण माहिती आमच्या विभागाकडे होती. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झाल्यावर २ कोटी ४५ लाख महिलांना लाभ वितरीत केला गेला. याचा अर्थ कुठेही संख्या कमी केली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. २१०० रुपये कधी मिळणार? या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा करू, असे वक्तव्य केलेले नाही. राज्य सरकारकडून योजना जाहीर केली जाते. त्यानुसार, निवडणुकीतील जाहीरनामा हा ५ वर्षांचा असतो. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पापासून २१०० रुपये देणार, असे वक्तव्य केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.