पिंपरी : गेल्या पाच वर्षांत (PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील जनताच भाजपला सत्तेतून हद्दपार करणार आहे. राज्यातील सत्ता बदलचा महापालिका निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसून विजय आपलाच आहे. शंभर प्लस हे आपले मिशन असून ते साध्य करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.
काळेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न झाली. यावेळी अजित गव्हाणे बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारणी, विधानसभा कार्यकारी, सर्व सेलची कार्यकारणी तसेच प्रभाग अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती पहिली मासिक सभा पार पडली.
त्याप्रसंगी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष राहूल भोसले, प्रशांत शितोळे, विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, पंकज भालेकर, विनोद नढे, संघटन सचिव अरुण बोऱ्हाडे, नारायण बहिरवडे, सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, माजी नगरसेवक मयूर कलाटे, विक्रांत लांडे, मोरेेश्वर भोंडवे, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, माजी उपमहापौर महंम्मद भाई पानसरे, कार्याध्यक्ष फजल शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गव्हाणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचार केल्याने शहराचा विकास खुंटला आहे. राष्ट्रवादीने केलेला विकास आणि भाजपने केलेला भ्रष्टाचार हा जनतेच्या दरबारात प्रभावीपणे मांडण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्यातील सत्तेचा कोणताही परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार नसून आपल्याला शंभर प्लस नगरसेवकांचे उद्दीष्ट साध्य करून महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचनाही गव्हाणे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव संम्मत करण्यात आला. तसेच येत्या २२ जुलै रोजी अजितदादा यांचा वाढदिवस असल्याने विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. यानंतर सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. तर बूथ यंत्रणा नियोजन आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले तर शेवटी विनोद नढे यांनी आभार मानले.