“वासुदेव आला, ओ वासुदेव आला…” च्या निमित्ताने …….

``वासुदेव आला, ओ वासुदेव आला…" च्या निमित्ताने …….

कामिल पारखे

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाचा नायक असलेला आदर्श शिक्षक गावात आलेला तमाशाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेला हा शाळामास्तर तमाशाशौकिनांच्या विरोधाची फिकिर न करता आपल्या नैतिक बळावर एकट्याने तमाशाचा रंगात आलेला खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो.

मुळात तमाशा हा एक अनैतिक प्रकार आहे आणि आपल्या गावच्या लोकांना त्यापासून दूर ठेवणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे, या समजापोटी हे मास्तर तमाशा बंद पाडण्याची धडपड करत असतात. तमाशातील नर्तकीच्या प्रेमात पडून या मास्तरांचे नंतर नैतिक अध:पतन होते, ही गोष्ट निराळी. मात्र तमाशाविषयी समाजात काय प्रतिमा होती, हे ‘पिंजरा’तील आदर्श मास्तरांच्या भूमिकेतून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या घोगरगावात आणि आसपासच्या परिसरातील अस्पृश्‍य लोकांनी तमाशात काम करू नये, तमाशाच्या फडाला हजेरी लावू नये, असा फ्रेंच असलेले फ्रान्सलीन संस्थेचे फादर गुरियन जाकियर (Fr. Gurien Jacquier) उर्फ जाकियरबाबा यांचा आग्रह होता. त्यांच्या विरोधास न जुमानता आसपासच्या एखाद्या गावात तमाशाचा फड भरला, तर ऐन रंगात आलेला प्रयोग ते बंद पाडत असत. तमाशा या लोककलेचे जतन करण्यासाठी आज विविध संस्थांतर्फे आणि शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या शतकात या ख्रिस्ती धर्मगुरूने या लोककलेविरुद्ध भूमिका का घेतली होती, हे जाणून घेण्यासाठी तमाशा या लोककलेचे स्वरूप माहिती करून घेतले पाहिजे.

माझ्या लहानपणी अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बाजारतळापाशीच तमाशाचे फड भरत असत. आमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरील मैदानात तमाशाचे तंबू उभारले जात असत. ज्येष्ठ तमाशाकलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, कांताबाई सातारकर आणि गुलाबबाई संगमनेरकर वगैरेंच्या तमाशाच्या फडांची दिवसभर चाललेली जाहिरात आम्ही मुले पाहत असू. मात्र घरातील वा शेजारपाजारातील कुणी प्रौढमंडळी या तमाशाच्या खेळाला जात नसत.

आठवड्याच्या बाजाराला येणारे आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकच प्रामुख्याने या लोककलेचे आश्रयदाते असत. आम्हा मुलांना सिनेमाला जाण्यास परवानगी असे. मात्र एकदा तरी तमाशा हा काय प्रकार असावा, याचा अनुभव घ्यावा असा विचारही कधी मनात आला नाही, याचे कारण तमाशा म्हणजे एक अश्‍लील कार्यक्रम आणि आंबटशौकीन रसिकांचे करमणुकीचे साधन असा सर्वांचाच समज होता.

“तमाशा कलेत चोरपावलांनी येणारी अनैतिकता हा तर चिंतेचा विषय आहे. महार, मांग, आणि कोल्हाट्याची बाई नाचवणं आणि पैसा फेकून तिला नागवणं, ही उच्चवर्णीय सरंजामी मानसिकता बदलली नाही, तर परंपरा म्हणून तमाशा का टिकवायचा, हाही प्रश्‍न आहे,” असे तमाशा-कलेचे एक अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी आपल्या ‘तमाशा : कला आणि कलावंत‘ या पुस्तकात लिहिले आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तमाशा क्षेत्राची अगदी जवळून ओळख असलेले अभिनेते निळू फुले यांनी म्हटले आहे, ‘‘मागास, अस्पृश्‍य समजल्या जाणाऱ्या महार, मांग, कोल्हाटी, गोपाळ आदी जातीचे कलाकार तमाशात जास्त आहेत. त्यांनीच ही कला टिकवली आहे. तमाशा क्षेत्रात कर्ज हा एक मोठा प्रश्‍न आहे. फडमालक सावकाराकडून कर्ज घेतात. तमाशातला कलाकार फडमालकाकडून कर्ज घेतात. अशा प्रकारे फडमालक कर्जबाजारी, कलाकार-कामगार कर्जबाजारी, कर्जावर चालणारा हा व्यवसाय आहे. कर्जामुळे कोणीही सुखी नाही. तमाशाला पैसे पुरवणारे बहुतेक सवर्ण असतात. तमाशातील स्त्री कलाकार कर्जबाजारी असेल आणि कर्ज फिटले नाही तर तिला भांडवलदाराच्या स्वाधीन व्हावे लागते. सतत दारिद्रयात राहूनही हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा प्रश्‍न नेहमी माझ्या मनात येत असे.’’ कदाचित तमाशा कलेवरील प्रेमापोटीच हा वसा त्यांनी स्वीकारला असावा, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतर तमाशावर अश्‍लीलतेचा आरोप झाला. त्यामुळे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी १९४८ साली तमाशावर बंदी घातली गेली. ही बंदी उठावी म्हणून तमाशा कलावंतांनी प्रयत्न केले.

त्या वेळी खेर यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘तमाशा सुधार समिती’ नेमली होती. या समितीने तमाशाचे संहिता लेखन आणि सादरीकरणाबाबतीत काही अटी घातल्यानंतर तमाशावरील ही बंदी उठवण्यात आली. तमाशात अश्‍लील संवाद नसावेत, दौलतजादा करताना तमासगीर नटीला हात लावू नये वगैरे अटी घालण्यात आल्या.

पुणे विद्यापीठाच्या पवळा पठ्ठेराव बापूराव साहित्य, संगीत, लोककला अकॅडेमी आणि पाथफाइंडर इंटरनॅशनल या संस्थांच्या वतीने पुण्यात २००७च्या ऑक्टोबरात तमाशा महोत्सव व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेत तमाशाबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ‘तमाशा’ शब्द हा फारशीतून उर्दूत आणि उर्दूतून मराठीत आला आहे, असे दिसते.

तमाशा हा प्रकार ज्या शाहिरांनी रूढ केला, तो शाहीर (शाईर हा मूळ शब्द) अरबी भाषेतून मराठीत आला आहे. त्यामुळे तमाशा हा कलाप्रकार मुसलमानांच्या प्रभावातून उदयास आला असावा, असे काही संशोधकांचे मत आहे.

महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारुड, लळिते आणि दशावतार या लोककलांचाही अर्थातच तमाशावर प्रभाव आहे. साधारणत: तमाशा ही लोककला महाराष्ट्रात महार, मांग, गोंधळी, कोल्हाटी, डोंबारी यांच्याच हाती राहिली, असे या पत्रिकेतही स्पष्ट म्हटले आहे.

उल्लेख केलेल्या या सर्व जाती अस्पृश्‍य, गावकुसाबाहेरच्या जातीजमाती. अर्थात या लोककलेचा आस्वाद घेणारे व पर्यायाने या कलाकारांचे विविध प्रकारे लैंगिक शोषण करणारे रसिकजन अर्थातच उच्चवर्णीय होते. तमाशातील स्त्रीकलाकारांचे लैंगिक शोषण करताना मात्र या कलावंतांची अस्पृश्‍यता तेवढ्यापुरती नजरेआड केली जात असे, हे विशेष.

आपल्या देशांत सर्वच पारंपरिक व्यवसाय जातींवर आधारित आहेत आणि सर्व लोककलांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. तमाशा ही लोककला प्रामुख्याने महार आणि मातंग जातीतील लोकांनी विकसित केली. या अस्पृश्‍य जातीतील महिला तमाशात नाचत आणि गात असत, तर पुरुषमंडळी ढोलकी, तुणतुणे, मंजिरा, डफ, हलगी, कड आणि पेटी ही संगीतवाद्ये वाजवत असत. त्यावरून या लोककलेला आणि तिच्याशी संबंधित असलेल्या कलाकारांना उच्चवर्णीयांत काय प्रतिष्ठा असे, याची कल्पना करता येते.

तमाशाचा हंगाम पावसाळा आणि शेतीचे कामे संपल्यानंतर दसरा ते अक्षयतृतीया या काळात असतो. लग्नसराईत वाजंत्री काम, यात्रेच्या हंगामात तमाशे इत्यादींतही महार प्रामुख्याने आढळतात.

मी लहान असताना घोगरगावात माझे मामेभाऊ अंतोन आणि शाहू शिनगारे लग्नसराईत पिपाणी, संबूळ , ढोलकी वगैरे वाद्ये वाजवत असत हे मला आठवते. यामागची कारणमीमांसा वरील संदर्भ वाचल्यानंतरच मला समजली. याचा अर्थ वाद्ये वाजवण्याची कला ते घरातील कुणाकडून किंवा नातेवाईकांकडून शिकले असणार. कुणी सांगावे, कदाचित माझ्या आजोळातील माझे काही नातेवाईकही त्यांच्या तरुणपणात म्हणजे फादर जाकियर यांच्या काळात तमाशातही झीलकरी वा इतर कामे करत असतील.

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरील लिहिलेल्या `माणूस, कलावंत आणि समाज’ या पॉप्युलर प्रकाशनाच्या (१९९२) पुस्तकातील एका लेखात तमाशाविषयी केलेली टिपण्णीही या संदर्भात पाहता येईल.

सुर्वे म्हणतात, “पंचवीस वर्षांपूर्वी तमाशा हा शब्द एखाद्या अस्पृश्‍यासारखा वापरला जाई. तमाशा म्हणजे सभ्य लोकांनी, शिष्ट लोकांनी, अगर पोळीबाळींनी न पाहावा, असा नाटकाचा एक प्रकार. त्यात नाच्यापोऱ्या असतो, तो घाणेरडे व अश्‍लील हावभाव करतो. शृंगारिक व चावट गाणी म्हणतो, त्याने सुसंस्कृत माणसांची अभिरुची बिघडते. तमाशा करणारे अस्पृश्‍य असतात व तो पाहणे पाप आहे, ही प्रचलित भावना त्या काळात होती.”

तमाशा या लोककलेचे लोकनाट्यात रूपांतर होण्याआधी पारंपरिक तमाशातील कलाकारांची जातीविषयक पार्श्‍वभूमी, स्त्रिकलाकारांचे लैंगिक शोषण आणि या लोककलेतील प्रयोगांतील संवाद आणि नाचगाण्यांतील अश्‍लीलता वगैरे संदर्भ ध्यानात घेतले म्हणजे जाकियरबाबांनी तमाशाला का विरोध केला हे समजते.

‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरही नैतिक दृष्टीकोनातूनच तमाशाच्या खेळास विरोध करत असतात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यात बियरबारमध्ये महिलांच्या नाचगाण्यांवर बंदी घातली आहे. त्यामागेही स्त्रियांच्या लैंगिक शोषणास आणि अश्‍लीलतेस विरोध अशीच त्यांची भूमिका आहे.

वैजापूर तालुक्यातले घोगरगाव माझे आजोळ. माझ्या आईवडिलांनी जाकियरबाबांना जवळून पाहिले. ”घोगरगावचे जाकियरबाबा (मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशनकार्य इ. स. १८९२ पासून ) हे मी लिहिलेले जाकियरबाबांचे चरित्र उषाताई आणि विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशनाने २००८ साली प्रसिद्ध केले

मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डी सेल्स (MSFS) किंवा फ्रान्सलीन या धर्मगुरूंच्या संस्थेचे सदस्य असलेल्या जाकियरबाबांनी १८९२ पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९४७) घोगरगावात मिशनकार्य केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरीक असलेल्या जेसुईट आणि इतर फादरांची हकालपट्टी केली तेव्हा शिर्डीजवळच्या राहाता येथे फादर जाकियर यांनी येशूसंघीय धर्मगुरुंचे काम चालू ठेवले होते. घोगरगावात त्यांची समाधी आहे.

जाकियरबाबांचे या परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहून कॅथोलिक चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.

फादर जाकियर यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या कुठल्याही लिखाणात त्यांनी तमाशाला केलेल्या विरोधाचा उल्लेख माझ्या वाचनात कधी आला नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि घोगरगावातील माझ्या मामांच्या संभाषणात मात्र याबाबतची चर्चा मी अनेकदा ऐकली आहे. शांत्वन आणि वामन शिनगारे या माझ्या दोन मामांनी जाकियरबाबांच्या छकड्यावर गाडीवान म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेली माहिती, याबाबत विश्‍वासार्ह मानता येईल. जाकियरबाबांविषयी घोगरगाव परिसरात अस्पृश्‍य ख्रिस्ती समाजात तसेच उच्चवर्णीय वगैरे मंडळीत मोठा आदर होता.

सरकारदरबारी कलेक्टर आणि तहसीलदार यासारख्या अधिकाऱ्यांशी आणि शेजारपाजारच्या गावांच्या पाटील वगैरे मंडळींशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांतील त्यांच्या कामांमुळे, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्याविषयीचा एक प्रकारचा दराराही असे. उच्चशिक्षित आणि युरोपियन असल्याने ब्रिटिश जमान्यात सरकारदरबारीसुद्धा त्यांचा वचक असे. त्यामुळे जाकियरबाबांनी अस्पृश्‍यतापालनासारख्या एखाद्या अनिष्ट वा अनैतिक सामाजिक रूढीस विरोध केला, तर अशा प्रसंगी त्यांच्या विरोधास जाण्याची कुणाची हिंमत नसायची. जाकियरबाबांनी तमाशाच्या प्रथेस विरोध केला, तेव्हाही असेच झाले असणार.

घोगरगाव आणि आसपासच्या परिसरातील महार समाजातील अनेक ख्रिस्ती स्त्री-पुरुषही त्या काळात तमाशात कलाकार म्हणून काम करत असतील, याविषयी शंकाच नाही. तमाशात नाच्या किंवा मावशीची भूमिका करणाऱ्या पुरुष नटाला लांब केस राखावे लागत. या ग्रामीण भागात अनेक वर्षे राहून या लोककलेचे एकूण स्वरूप समजल्यानंतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूने आपल्या धर्मग्रामातील ख्रिस्ती महिलांस तमाशात नाचण्यागाण्यापासून परावृत्त केले असते. ख्रिस्ती पुरुष मंडळींनी तमाशात अश्‍लील स्वरूपाची नाचगाणी म्हणू नये, नाच्याचे काम करू नये, यासाठी त्यांच्यावरही दबाव आणला असता.

जाकियरबाबांनी तर घोगरगाव परिसरात आपल्या आयुष्याची चार दशके घालवली. या फ्रेंच धर्मगुरूने घोगरगावात आल्यानंतर इंग्रजी आणि मराठी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळवले होते. घोगरगावातील ख्रिस्तराजा मंदिरात त्यांनी अनेक वर्षे नवख्रिस्ती लोकांना मराठी भजने, गायने शिकवली. तमाशाला त्यांनी विरोध करण्याआधी त्यांनी या लोककलेच्या विविध अंगांचा अभ्यास नक्कीच केला असणार.

फादर जाकियर यांचा तमाशाला असलेला कडवा विरोध पाहता ते घोगरगावात असताना या लोककलेचे प्रयोग या गावात झाले असतील, याविषयी दाट शंकाच आहे. मात्र आसपासच्या खेड्यांत तमाशाचे खेळ होतच असत. यात्रेच्या वा इतर कुठल्याही निमित्ताने तमाशाचे प्रयोग असले म्हणजे त्या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पुरुषमंडळी तेथे आवर्जून हजर राहत असत. तमाशाचे हे प्रयोग रात्रीच रंगत असत. ढोलकीच्या आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर तमासगीर महिला आणि पुरुष गात आणि नाचत असत.

अशा वेळी फादर जाकियर आपली घोडागाडी बाहेर काढून त्या आवाजाच्या दिशेने निघत. रात्रीच्या वेळी नदी किंवा ओढे ओलांडून तमाशाच्या जागी ते पोहोचत असत. त्या अस्पृश्‍य स्त्री-पुरुष कलाकारांनी तमाशाच्या माध्यमातून होणारे त्यांचे स्वत:चे लैंगिक शोषण रोखावे म्हणून त्यांना उपदेश करत असत. अनेकदा उपदेशाऐवजी त्या लोकांची कानउघाडणीच केली जात असणार. तमाशापथक मोगलाई परिसरातील असले तर त्यातील बहुतेक तमासगीर जाकियरबाबांच्या धर्मग्रामातील ख्रिस्ती लोकच असत.

तमाशाचा ऐन रंगात आलेला प्रयोग अशा प्रकारे बंद पाडल्यानंतरही हे तमासगीर दुसरीकडे कुठेतरी तमाशाचे खेळ चालूच ठेवतील म्हणून फादर जाकियर त्यांची ढोलकी, तुणतुणी, डफ वगैरे वाद्ये आपल्या ताब्यात घेत असत. कलावंतिणीच्या पायातील चार-पाच किलो वजनाचे घुंगरूही काढून घेत. त्याशिवाय पुरुष कलाकारांनी नाच्याची किंवा मावशीची भूमिका करू नये, म्हणून त्यांनी लांब वाढवलेल्या केसांनाही कात्री लावत असत.

जाकियरबाबांच्या आठवणींना माझे आईवडील, मामा आणि इतर जुनी मंडळी उजाळा देत, तेव्हा हे फादर तमाशा कसे बंद पाडत असत, हे याविषयी हमखास बोलले जाई. जाकियरबाबांनी तमासगिरांकडून ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घोडागाडीतून घोगरगावात आणलेल्या ढोलकी, तमासगीर कलावंतिणींचे घुंगरू, तुणतुणे, डफ वगैरे संगीतवाद्यांनी मिशन कंपाऊंडमधल्या दोन खोल्या भरल्या होत्या, हे माझी आई आजही आवर्जून सांगत असते.

मागे घोगरगावला मी भेट दिली, तेव्हा तेथील मुख्य धर्मगुरू फादर स्टीफन अल्मेडा यांनीही यास दुजोरा दिला. तमासगिरांची ती संगीतवाद्ये दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मिशन कंपाऊंडमधील काही खोल्यांत सांभाळून ठेवण्यात आली होती, असे त्यांनी ऐकले आहे, असे त्यांनी मला सांगितले.

महार-मांग या अस्पृश्‍य जातीतील लोकांसाठी तमाशा ही लोककला तर उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. समाजातील या सर्वाधिक उपेक्षित घटकांचा तोंडचा घास हिरावून घेण्याचा फादर जाकियर यांचा मुळीच उद्देश नव्हता. तमाशाबाबत जाकियरबाबांची भूमिका समाजसुधारकाची होती. आपल्या धर्मग्रामातील अस्पृश्‍य लोकांच्या आर्थिक आणि उन्नतीसाठी फादर जाकियर यांनी आणि मोगलाईतील किंवा अहमदनगर जिल्ह्यातील इतर मिशनरींनी अनेक प्रकल्प राबवले होते. लोकांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी ते धावून जात असत. आपल्या धर्मग्रामातील खेड्यांतील मुलांनी साक्षर व्हावे म्हणून जाकियरबाबांनी अनेक गावांत शाळा सुरू केल्या होत्या.

या शाळांत सर्व जाती-धर्मांच्या मुलांना फुकट शिक्षण दिले जात असे. या शाळांच्या मास्तरांच्या निवासस्थानांचा आणि पगाराचा खर्चही फादर स्वत: उचलत असत. तमाशातील काम सोडले तर या लोकांसाठी उदरनिर्वाहाची दुसरे पर्यायही त्यांनी उपलब्ध करून दिले होते.

घोगरगावात सध्या उभ्या असलेल्या उंच शिखरवजा ख्रिस्तराजा मंदिराचे काम एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात वीस वर्षे चालू होते. ( येथे चर्चचा हा फोटो दिला आहे ) या बांधकामामुळे आसपासच्या अनेक सुतार, गवंडी अशा कुशल कारागिरांना तसेच इतर अनेक अकुशल कामगारांना अनेक वर्षे रोजगार उपलब्ध झाला होता.

जाकियरबाबांचा तमाशाला असलेला विरोध आणि या लोककलेचे प्रयोग बंद पाडण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा याला अर्थातच शंभर वर्षांपूर्वीच्या काळाचा संदर्भ आहे. त्या काळात स्त्रियांनी नाटकांत वा चित्रपटांत काम करणेसुद्धा अनैतिक समजले जाई आणि त्यामुळे अगदी बालगंधर्वांच्या काळापर्यंत पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करत असत.

आज शासन आणि विविध संस्था-संघटना तमाशासारख्या लोककलांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तमाशा या लोककलेने सातासमुद्रापार, पाश्‍चिमात्य देशापर्यंत मजल मारली आहे. मात्र अजूनही या लोककलेचा जातीय संदर्भ नाहीसा झालेला नाही. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतर, अस्पृश्‍यता कायद्याने बंद झाल्यानंतर आजही सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांत सफाई कामगार, भंगी, शिपाई वगैरे कामे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य समाजातीलच लोक करतात. तसेच खेड्यापाड्यांत होणाऱ्या तमाशातील बहुसंख्य स्त्री-पुरुष कलाकार आजही महार, मांग, कोल्हाटी या समाजातीलच आहेत.

‘आजही तमाशात गायक म्हणून महार कलावंताची संख्या जास्त प्रमाणात आहे’, असे डॉ. कसबे यांनी म्हटले आहे. या लोककलेशी निगडित असलेले दलित जातींविषयक संदर्भ अजूनही पुसले गेलेले नाहीत.

‘ब्राह्मणाघरी लिव्हनं, महाराघरी गाणं आणि मांगाघरी वाजवणं’ किंवा ‘महाराचं गाणं आणि मांगाचं डफडं‘ अशा म्हणी प्रचलित आहेत. या जातींविषयक संदर्भांमुळे आणि इतरही काही कारणांमुळे चित्रपटसृष्टीतील आणि रंगभूमीवरील स्त्री-पुरुष कलाकारांना हल्ली मिळणारी प्रतिष्ठा, धनप्राप्ती आणि ग्लॅमरचे वलय तमासगिरांच्या नशिबी अजून तरी नाही.

तमासगीर कलावंतांचे होणारे लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आजही पूर्णत: बंद झालेले नाही. हे शोषण बंद करण्यासाठी तमाशाचे प्रयोग बंद करण्याची मुळीच जरुरी नाही. मात्र तोंडाला रंग फासून रंगमंचावरून, छोट्या वा मोठ्या पडद्यांवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला येणारे आर्थिक आणि इतर लाभ दलित समाजातील या लोककलाकारांनाही मिळावेत, अशी माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

‘सांता क्लॉज या विदेशी काल्पनिक पात्राला उत्तेजन देण्याऐवजी वासुदेव यासारखी आपल्या देशी सांस्कृतिक वैभव असलेल्या लोककला जिवंत ठेवायला हवे’, अशी चर्चा या नाताळ सणानिमित्त सोशल मीडियावर झाली आहे. वासुदेवप्रमाणेच तमाशात विविध कामे करणारे तमासगिर लोक, पोतराज, मसणजोगी, नंदीबैलवाले, ग्रहण सुटल्यावर घरोघरी उरलेले अन्न मागणारे लोक, बहिरूपी, थरारक अंगकसरती करणारे डोंबारी लोक, भविष्य सांगणारे कुडमुडे जोशी, वगैरे विविध समाजघटकांनी या लोककला जिवंत ठेवल्या आहेत.

पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.