सुलभ शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी आणि हाडे

सुलभ शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी आणि हाडे

पिंपरी चिंचवड : भोसरी येथील बालाजी नगर येथे सुलभ शौचालयाच्या हौदात मानवी कवटीसह काही हाडे सापडली आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक शोध घेत आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही हाडे पुरुष की महिलेची आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.

दोन मुलं सुलभ शौचालयाच्या हौदात मासे पकडत होते. तेव्हा, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत कवटीसह हाडे मिळाली. या घटनेचा तपास सुरु असून सापडलेली हाडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली.

दरम्यान, हाडे बाहेरून आणून तिथे टाकल्याचा संशय पोलिसांना असून इतर हाडांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय परिसरात कोणी बेपत्ता आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. तसेच या घटनेबाबत स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे.