रोहित आठवले
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातील १२५ तासांच्या कथित रेकॉर्डिंग पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरी चिंचवडहून (Pimpri Chinchwad) पेटल्याचे आता समोर येत आहे.
ज्या गुन्ह्यात संबंधित आरोपीचे वकीलपत्र घेण्यात आले. तो गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. तर तपासात २०२१ मध्ये आरोपींच्या अटकेनंतर जामिनासाठी संबंधित वकिलाला आरोपींच्या कुटुंबाने भेटून वकीलपत्र दिले होते.
या कथित प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण (Adv Pravin Chavan) यांचे रेकॉर्डिंग असलेल्याचे सांगणारा पेनड्राईव्ह नुकताच विधानमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सादर झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. हे मोडतोड (मॅन्यूप्लेटेड) केलेले रेकॉर्डिंग असून, माझा अशिल तेजस मोरे याने मला दिलेल्या घड्याळात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे केल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. तर तेजस मोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, चव्हाण यांनी दावा केल्यानुसार तेजस रवींद्र मोरे (Ravindra More) यांच्यासह चार जणांवर एक फसवणुकीचा गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर मोरे यांच्या किंवा सहआरोपी असणाऱ्या अन्य दोघांपैकी कोणाएकाच्या कुटुंबीयांनी जामिनासाठी वकील चव्हाण यांची भेट घेऊन वकीलपत्र दिले होते. तेव्हा संबंधितांचा वकील चव्हाण यांच्याशी प्रथम संपर्क आला. त्यामुळे महाविकासआघाडीच्या विरोधातील पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरी चिंचवडहून पेटली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
साडे बारा कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा; आरोपींना गुजरात मधून अटक
मोरे आणि अन्य चार जणांवर चिखली येथील जमीन भागीदारीत विकसन करण्यासाठी झालेल्या व्यवहारात साडे बारा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.
आकुर्डी (Akurdi) मध्ये राहणाऱ्या व्यक्तीची चिखली (Chikhali) येथील जागा भागीदारीत विकसन करण्यासाठी ही जागा बँकेकडे गहाण ठेवून मंजूर झालेल्या २१ कोटींपैकी १२ कोटी ५० लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप संबंधितांवर ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व प्रकरण जून २०१७ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत खंडोबामाळ चौक, आकुर्डी येथे घडल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला असून, यातील काही आरोपींना गुजरात मधून अटक करण्यात आली होती.
डिसेंबर २०२० मध्ये आरोपीला अटक केल्यावर पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर जानेवारी २०२१ मध्ये आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. तेथून जून २०२१ मध्ये आरोपींची पिंपरी ( Pimpri) कोर्टाच्या आदेशाने जामिनावर मुक्तता झाली आहे.