मुंबई : प्रसिद्ध लालबागचा राजा दरबारात पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की करत असल्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर लालबागचा राजा मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत.
‘हात काय, पाय पण लावेन…
पोलीस निरीक्षक संजय निकम स्वतः तर मास्क घातला नव्हता. आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडण्यात आले नाही. उलट त्याला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ”हात काय, पाय पण लावेन”, अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या या कृत्यानंतर मीडियाने त्या ठिकाणी आलेल्या पोलिस उपायुक्तांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी व्हिडिओ पाहून कारवाई करू, असे सांगितले. पोलिसांच्या या वर्तनामुळे आता राज्याच्या गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत एनयुजे महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतल करदेकर म्हणाल्या की, हा संतापजनक प्रकार असून याचा निषेध व्हायला हवा, मिडियाकर्मी आरोपी किंवा दंगलखोर आहेत का? धक्काबुक्की करायचा अधिकार यांना कुणी दिला? या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. हा कसला सिंघम? काय याची भाषा? हात लावून,पाय लावेन? यांना लोकांशी कसं वागायचं हे शिकवायला हव, राजकीय नेते व पोलीस यांना लोकशाही काय, नि कसं वागायचं हे कळायला हवंच.