संगतीमुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला गेला ; प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका

संगतीमुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला गेला ; प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका

पिंपरी, ता. १३ : सत्ता नसताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्ववाचा विचार होता. सत्ता आल्यानंतर संगतीच्या परिणामामुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदूत्ववाचा विचार बाजूला गेला. अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रहाटणी येथे केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संगती असा उच्चार करण्याचे टाळले.

रहाटणी चौक येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याचे अनावरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी आपल्या भाषणात ते बोलत होते.

त्याप्रसंगी महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक चंद्रकांत नखाते व बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सुनीता तापकीर व सविता खुळे, नगरसेवक नाना काटे व शत्रुघ्न काटे, महापालिका अधिकारी तसेच भाजपाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रविण दरेकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायचे, मात्र उद्धव ठाकरे साहेब तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीटही रचली नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडला. त्यामुळे सरकार पोलिसांचा वापर करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर षडयंत्र करित आहे.