पुणे : प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स स्वयंसेवकांनी सीएसआर अंतर्गत बाल शिक्षण विषयावर कार्यशाळा व शालेय साहित्य वाटप हा उपक्रम मावळ तालुक्यातील शिक्षणग्राम व आभाळमाया वसतिगृहात राबविण्यात आला.
समाजात अनेक व्यक्ती दैनंदिन वस्तूंसाठी वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील आनंदाचे काही क्षण यावे म्हणून सेल्सफोर्स कंपनीच्या सुमारे 28 स्वयंसेवकांनी प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन सोबत संयुक्तपणे सीएसआर अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले.
मळवली येथील शिक्षणग्राम वसतिगृहातील 175 मुलांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप, टोपी व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच यावेळी बाल शोषण विषयावर कार्यशाळाही घेण्यात आली. त्यामध्ये मुलांना बाल शोषणापासून कशाप्रकारे बचाव करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मावळ तालुक्यातील पाचाने येथे आभाळमाया आश्रयस्थानातील 25 मुलींना संपूर्ण शालेय व संस्थेला पुढील 6 महिन्यांकरिता दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, किराणा देण्यात आला. तसेच बाल शोषण विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती शांताबाई येवले यांनी अनाथ मुलींचे संगोपन व शिक्षणासाठी संधी मिळावी म्हणून 2003 मध्ये आभाळमाया या वसतिगृहाची सुरवात केली. आजपर्यंत येथे 200 हून अधिक मुलींचे संगोपन झाले असून त्या पुढील जीवन यशस्वीपणे जगत आहेत.