गायकवाड दांपत्याचा “आदर्श माता-पिता” पुरस्काराने गौरव

गायकवाड दांपत्याचा “आदर्श माता-पिता” पुरस्काराने गौरव

पुणे : आदर्श गाव गावडेवाडी येथील निवृत्ती तुकाराम गायकवाड व सुभद्रा निवृत्ती गायकवाड यांचा सुसंगत फौंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘आदर्श माता –पिता राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते.

यावेळी डॉ. देखणे म्हणाले की, ‘आधुनिक कालामध्ये सर्व जगभर सुसंवाद हरवत चालला आहे, अशावेळी आपल्या मुलांना सुसंस्काराची शिदोरी आणि उच्च शिक्षण देणारे माता-पिता समाजासाठी दिशादर्शक आणि आदर्शरूप आहेत.’आजच्या काळात कुटुंब संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर असताना गायकवाड दांपत्यांनी आपले सारे कुटुंब उच्च विद्याविभूषित करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

अध्यक्षपदावरुन बोलताना उल्हास पवार म्हणाले की, श्री. गायकवाड दांपत्य आदर्शच असून त्यांचा हा सन्मान म्हणजे समाजातील असंख्य कुटुंबियांना दिशादर्शक ठरणार आहे. निवृत्ती गायकवाड व सुभद्रा गायकवाड स्वत: अल्पशिक्षित असून संपूर्ण कुटुंबाला सुसंस्काराबरोबर उच्च शिक्षण दिले याशिवाय वारकरी संप्रदायाच्या प्रवचन – कीर्तनाच्या माध्यमातून समाज शिक्षण ही गेली साठ वर्ष करीत आहेत. हे कौतुकास्पद आहे. श्रीयुत निवृत्ती बुवा गायकवाड आज ८९ वर्षातही आळंदी-पंढरपूर दिंडी सोहळ्यात सहभागी होतात व समाज प्रबोधनाचे काम करतात. हे ही त्यांचे काम आदर्शवत आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर सुसंगत फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर न्हाळदे उपाध्यक्ष धोंडीराम गडदे, सचिव संगीता न्हाळदे, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, डॉ. संजय मेस्त्री, डॉ. तृप्ति अंब्रे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. शिल्पा शितोळे,, डॉ. वैशाली खेडकर, प्रा. संजीवनी पाटील, भीमाताई लोंढे, किशोर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनगर यांनी केले.