दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच | राम शिंदेचे आ रोहित पवार यांना खुले आव्हान

दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच | राम शिंदेचे आ रोहित पवार यांना खुले आव्हान
  • सोमवारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत (प्रतिनिधी) : दोन वर्षात काय विकासाचे काम केले आहे ते एकदा आमने सामने झालेच पाहिजे असे म्हणत राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांना खुले आव्हान दिले. ते कर्जत येथे भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते. यावेळी खा.डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, जामखेडचे अजय काशीद, रवी सुरवसे आदी उपस्थित होते. सोमवारी दुपारी भाजपाने मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी पुढे बोलताना माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण विधानसभेत सांगितल्याप्रमाणे कर्जत शहराचे सर्व प्रलंबित प्रश्न प्रामाणिकपणे सोडविले. मंत्रीपदाचा पदभार घेतल्यावर सर्वप्रथम कर्जतचा पाणी प्रश्न तात्काळ सोडविला. यासह सर्व प्रभागात अनेक रस्ते, स्मशानभूमी, गार्डन, चौक सुशोभीकरण कामे मार्गी लावले. त्यामुळे आपल्याला कर्जतच्या जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळेच यंदाची कर्जत नगरपंचायतीची निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या हाती दिली आहे. दोन वर्षात आपण पत्रकार परिषद घेत मतदारसंघातील समस्या उपस्थित केले मात्र विद्यमान आमदारांनी त्यास देखील उत्तर दिले नाही. यातच त्यांचे काम आणि त्यांची हतबलता दिसते. सध्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे जमिनीचे सातबारा उतारे धोक्यात आहे. कर्जत शहरात दोन राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे मात्र त्यांना देखील भेट देत नाही. सध्या ते फक्त गप्पा मारण्याचे काम करून जनतेला फसवीत आहे. लोकांना दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळावा. सर्वसामान्य जनतेला दबावाखाली आणू नका, हा राम शिंदे या जनतेसाठी जीवाची बाजी लावून पुढे उभा राहील. आता जनता दडपशाही, मुस्कटदाबी सहन करणार नाही. या निवडणुकीत भूलथापाना बळी पडू नका विकासकामे मनात ठेवून भाजपाला साथ द्या अशी साद राम शिंदे यांनी मतदारांना घातली. आपण अभिमानी आणि स्वाभिमानी आहोत याची प्रचिती कर्जतकरानी विरोधकांना द्यावी असे आवाहन केले.

खा सुजय विखे म्हणाले की, ज्या माणसाने मोठे करून विविध पदे दिली. आज त्यानीच राम शिंदेचा विश्वासघात केला. त्यामुळे आजची निवडणूक ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी अशी नसून ती विश्वासघातकी माणसाची लायकी दाखविणारी आहे. राम शिंदे यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे. कारण त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. आमचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. ते सर्वसामान्य नागरिकांच्या हवाली केले आहे. त्यामुळे जनतेनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन खा विखे यांनी उपस्थित जनतेला केले. विरोधकानी प्रदीर्घ काळ नुसते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी लावला. याचाच अर्थ त्यांनी राम शिंदे आणि भाजपाचा मोठा धसका घेतला आहे हे अधोरेखित होत असून आगामी निवडणुकीत भाजपला साथ द्यावी असे म्हंटले.

प्रास्ताविक करताना नुतन जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले की, माजीमंत्री राम शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात विकासाची कामे झाली. या विकासकामामुळे कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलला. खा सुजय विखे यांनी देखील आपल्या कार्याने त्यावर कळस उभा केला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, आरपीआयचे शशिकांत पाटील, दादासाहेब सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, वैभव शहा, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी इच्छुक उमेदवार, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजपा समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जेवरे यांनी केले तर आभार अनिल गदादे यांनी मानले.