रयतेचा आधारवड हरपला – संजोग वाघेरे पाटील

रयतेचा आधारवड हरपला - संजोग वाघेरे पाटील

पिंपरी : “अन्याय, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या बद्दल चीड असणारे कष्टकरी कामगार, शेतकरी या सारख्या सामान्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र झगडणारे स्वर्गीय प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणजे एक धगधगते अग्निकुंड होते. शाहू फुले, आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असणारे स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा रयत शिक्षण संस्थेच्या विस्तार आणि विकासात मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने रयतेचा आधारवड हरपला” असे प्रतिपादन संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहताना महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे असामान्य व्यक्तिमत्व होते. रयतेच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचावी ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची इच्छा त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाड्या-पाड्या पर्यंत नेऊन पूर्ण केली. त्यांचे विचार कृतीत आणणे ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल”.

महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय या पिंपरी येथील रयत संकुलाच्या संयुक्त विद्यमाने या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव पाटील, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, माजी शिक्षण मंडळ सभापती हनुमंत नेवाळे, महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, प्रा. विद्यासागर वाघेरे, प्रा. निता शेटे, प्रा. मनिषा निकम, प्रा. शंकर पाटील यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी नवमहाराष्ट्र विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब वाघेरे, महात्मा फुले महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे डॉ. नीलकंठ डहाळे, डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. लक्ष्मण जगदाळे, श्री. राजेंद्र गायकवाड, सौ. उज्वला तावरे तसेच तिन्ही संकुलाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित होते.