पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) मध्ये २८ फेब्रुवारी २०२२ अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून एका दिवसात ७५ पेटंट्सची नोंदणी करत एक नवीन विक्रम केला आहे.
अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. हिरीष तिवारी यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नोंदणी झालेल्या ७५ पेटंटची पुस्तिका करण्यात आली त्याचे प्रकाशन विश्वस्त मंडळाच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११ मार्च) करण्यात आले.
प्राचार्य डॉ. हिरीष तिवारी यांनी सांगितले की, जगामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान उंचाविण्याकरिता नाविन्यपूर्ण संशोधन होणे व बौद्धिक-संपदा हक्कांची नोंदणी होणे अत्यावश्यक आहे. यासाठी पीसीसीओईआर मध्ये स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. संशोधनातून व बौद्धिक संपदेतून संपत्ती निर्माण करुन राष्ट्रीय जीडीपी मध्ये मोलाचे योगदान देता येते. या विक्रमात नोंदणी झालेल्या पेटंट्स मधील निवडक संकल्पनांवर उत्पादन निर्मितीच्या प्रक्रियेस पीसीसीओईआरने सुरुवात केली आहे.
या ७५ पेटंट्सच्या विक्रमात पीसीसीओईआरच्या सर्व शाखांतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान आहे. याचे नियोजन प्रा. राहुल बावणे यांनी केले. पीसीसीओईआर मध्ये सिव्हील, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन आणि मेकॅनिकलइंजिनीरिंग या चारही विभागांनी तीन वर्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे एनबीए मानांकन प्राप्त केले आहे अशीही माहिती प्राचार्य डॉ. तिवारी यांनी दिली.