श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

अहिल्यानगर, दि. २६ : श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व कृषी ग्राम विकास प्रतिष्ठान घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसात वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. आजच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे किसनराव तात्या पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब पानसरे यांनी भूषविले. झेंड्याला सलामी देत फॅशन डिझाईनच्या मुली यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत स्वागत गीताची लयबद्ध गुंफण घातली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रस्ताविक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विचार मंचावर दत्तकृपा शैक्षणिक संकुलाच्या सचिव अर्चना पानसरे, संस्थेचे रजिस्टर कल्याण शिंदे शैक्षणिक संकुलातील विविध विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दुग्धशास्त्र व वनस्पती विकृती शास्त्र विभागांतर्गत मॉडलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध दुग्ध पदार्थ व आळंबची पावडर त्यापासून बनवलेल्या पापड व विविध पदार्थ असलेल्या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी मनोगत व्यक्त करत असताना बीएससी ऍग्री चा विद्यार्थी स्वामी राजेश्वर यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय लोकशाही किती महत्त्वाची आहे यावर भाष्य केले.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर, एम बी ए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निंभोरे, अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. विजयकुमार करळे, साईकृपा कला महाविद्यालयाचे प्रा. गौतम साळवे, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. विक्रम पानसरे, कृषी डिप्लोमाचे प्रा. अशोक भुजबळ यांची भाषणे झाली.

भारतीय संविधान व त्याचे महत्त्व या विषयावर साईकृपा कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम कांबळे बोलताना म्हणाले की, भारतीय संविधान हे जगात सर्वात मोठे व सक्षम संविधान असून त्यासाठी राबवणारे हात सुद्धा तितके सक्षम असायला हवेत. आज भारत देशामध्ये राज्यकर्ती जमात सर्वात जास्त संविधानाची पायमल्ली करताना दिसत आहे. यासाठी संविधानाची जागृती जनतेमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये होणे अतिशय गरजेच आहे. भारतीय संविधानाने जातिवाद, धर्मवाद, प्रांतवाद नष्ट केला. अस्पृश्यता नष्ट केली, वेठबिगारी नष्ट केली, किताब नष्ट केले, सर्वांना समान न्याय दिला. देशामध्ये समता, एकता, बंधुत्व, न्याय याची निर्मिती केली. स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल केले. सर्वांना समान संधी बहाल करत मताचा अधिकार दिला. पूर्वी राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा आता जनतेच्या मतातून राजा जन्माला येतो. त्यामुळे रंजल्या गांजल्या माणसांना सुद्धा प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त झाली, ही सारी घटनेची किमया आहे. असे मत व्यक्त करत भारतीय संविधानातील अनेक महत्त्वाच्या कलमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शेवटी कार्यक्रमाचे आभार, अध्यापक विद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. प्रवीण खेंडके यांनी मांडले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र गायकवाड व प्रा. स्वप्नील शिंदे यांनीअतिशय ओघवत्या भाषेत अलंकाराची गुंफण करत शेरोशायरी, कविता या माध्यमातून करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाची सांगता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांनी वंदे मातरम् हे गीत गाऊन केली. या यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमासाठी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान तसेच दत्तकृपा फाउंडेशनचे अध्यक्ष व पणन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन दत्तात्रय पानसरे तसेच संस्थेच्या सचिव अर्चना पानसरे संस्थेचे रजिस्टर कल्याण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. रवी वारे यांनी उत्कृष्ट प्रकारचा माइक व इतर इलेक्ट्रॉनिक संच उपलब्ध करून दिल्याने कार्यक्रम बहारदारपणे पार पडला.