कर्जत, ता. २० (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कर्जत शहरातील नगरपंचायतीच्या महिला स्वच्छता कामगारांचा तिळगुळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला. साई हॉस्पिटल याठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रोटरीचे सदस्य रो. अक्षय राऊत तसेच रो. ओंकार तोटे या दोघांच्या सौभाग्यवतींनी कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या वेळेस विजय मिळवल्याबद्दल त्यांचा सपत्नीक रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोटरीचे माजी अध्यक्ष रो. प्रा. विशाल मेहेत्रे यांनी रोटरीने आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या वेळी नवनियुक्त नगरसेविका उषा राऊत यांनी सत्काराला उत्तर देताना रोटरी क्लबचे आभार मानले व रोटरी क्लब राबवित असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की कर्जत शहरातला स्वच्छ सुंदर व हरित बनवण्यामध्ये रोटरी क्लबचा खूप मोठा वाटा आहे. कोरोना काळामध्ये ही रोटरीने सर्वसामान्य जनतेसाठी व कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील मेडिकल स्टाफसाठी पी.पी. ई.कीट उपलब्ध करून मोलाचे योगदान दिले आहे.
या प्रसंगी रोटरीचे विद्यमान अध्यक्ष रो. इंजिनीयर रामदास काळदाते यांनी वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली. कर्जत शहराला स्वच्छ, सुंदर व रोगमुक्त ठेवण्यामध्ये नगरपंचायतच्या महिला सफाई कामगारांचा खूप मोठा वाटा आहे. स्वच्छता दूत म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका यामुळे कर्जतकरांचे आरोग्य अबाधित ठेवले जाते, त्याबद्दल त्यांनी सर्व महिला भगिनींचे कौतुक करून आभार मानले. रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत या महिला स्वच्छता दूतांचा साडी व तिळगूळ देऊन सन्मान केला.
कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी रो. श्री. गोविंद जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष रो. डॉ. संदीप काळदाते, माजी अध्यक्ष रो. राजेंद्र सुपेकर तसेच रोटरीचे सचिव रो.राजेंद्र जगताप, खजिनदार सचिन धांडे, रो. नामदेव गायकवाड, रो.घनश्याम नाळे, रो. श्रीराम गायकवाड, रो. सुरेश नहार, रो. उत्तम मोहोळकर, रो. सदाशिव फरांडे, रो. गणेश जेवरे, रो. अक्षय राऊत, रो. ओंकार तोटे व डॉ. कार्तिकी काळदाते, सौ. गायकवाड, सोनाली, मेहेत्रे, जगताप व सौ. काळदाते हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. प्राचार्य चंद्रकांत राऊत यांनी केले व आभार रोटरीचे सचिव रो. राजेंद्र जगताप यांनी मानले.