ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”

  • यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी मुंबईकरांना साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभव
  • लोककलावंत भारुडकार चंदाताई तिवाडी प्रेक्षकांना करणार भारुडाने मंत्रमुग्ध
  • मृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदी
  • लोकसंगीत, लोकनृत्य, गझी लोकनॄत्य, यांचा आस्वाद
  • महिला कुस्त्याचा आनंद
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”

मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.

माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना – माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स हा ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांचे पहिले वाणिज्य व्यासपीठ आहे. महिला उद्योजकांसाठी योग्य ते उद्योजकीय वातावरण तयार व्हावे यासाठी या मंचाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महिला उद्योजकांना माहिती देणे, तज्ज्ञांचा सल्ला मिळविणे, बिझनेस नेटवर्क वाढविणे, अभ्यासदौऱ्याचे आयोजन करणे, विशेषज्ञांसोबत चर्चा घडवून आणणे, महिला उद्योजिका आणि शेतकऱ्यांसाठी विपणन संधी निर्माण करणे इत्यादी कामे हे चेंबर करते. माणदेशी महोत्सव हा ग्रामीण महिला उद्योजिकांना शहरी बाजारपेठ समजून घेणे आणि शहरातील ग्राहकांशी थेट संवाद साधणे यासाठी तयार केलेला हा मंच आहे.

काय आहे यंदा माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी/खरेदीकरण्यासाठी

गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून मुंबईकरांना घेता येणार आहे. यंदा सुरवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती, आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे. मुंबईकरांना या महोत्सवामध्ये माणदेशीची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य खरेदी करता येणार आहेत. तसेच माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. या वर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. खणाच्या साड्या, कसुती वर्क इ. साताऱ्यातील महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

महिला सक्षमीकरणासाठी यंत्रसामुग्री

अन्न प्रक्रिया,कचरा व्यवस्थापन, पॅकेजिंग, बेकरी, टेक्स्टाईल आदी व्यवसायांशी निगडीत यंत्रसामुग्रीचे प्रदर्शन. या यंत्रसामुग्रीमुळे कोणतीही महिला अल्प गुतंवणुकीच्या बळावर उद्योजिका बनू शकते.

मुंबईकरांना गावाकडील संस्कॄतीचा प्रत्यक्ष अनुभव

या महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार. बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता. तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता.

दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गझी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. शेवटच्या दिवशी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.

माणदेशी महोत्सवातील यंदाचे मुख्य आकर्षण

यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक मृदुला दाढे-जोशी आणि माणतालुक्यातील आर.जे केराबाई यांचे संगीत ऎकायला मिळणार आहे. माणदेशी तरंग वाहिनीचे ग्रामीण कलाकार पथनाट्य सादर करणार आहेत.

गुरुवार ९ जानेवारी ते रविवार १२ जानेवारी २०२०, ४ दिवस रविंद्रनाट्य मंदिर प्रभादेवी येथे चालणारा माणदेशी महोत्सव सर्वांसाठी मोफत आहे, या महोत्सवास मोठ्या प्रमाणावर भेट देऊन मुंबईकरांनी आपल्या माणदेशी भगिनींना प्रोत्साहीत करावे असे आवाहन महोत्सवाच्या आयोजक चेतना सिन्हा यांनी केले आहे.

चारदिवसाच्या कार्यक्रमाची रुपरेषा

९ जानेवारी – पहिला दिवस, उद्घाटन सोहळा – ११.०० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. गझी लोकनृत्य सादरीकरण

लोककला भारुडकार चंदाताई तिवाडी यांचे भारुड या कलेचे सादरीकरण – सायंकाळी ६.०० ते ८.००.

१० जानेवारी – दुसरा दिवस – माणदेशी तरंग वाहिनीच्या ग्रामीण कलाकारांचे कला आणि पथनाट्य सादरीकरण – सायंकाळी ६.०० ते ७.३०

११ जानेवारी – तिसरा दिवस, मृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदी – सायंकाळी ६.०० ते ७.३०.

१२ जानेवारी – चौथा दिवस, महिला कुस्ती – सायंकाळी ५.३० ते ९.०० रात्री ९.३० वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.