मुंबई (वृत्तसंस्था) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
यापूर्वी एजाजच्या मुलीला अटक करण्यात आली होती. खोटा पासपोर्ट बनवून पळून जायच्या बेतात असलेल्या त्याच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यानंतर तिच्याकडून माहिती घेत एजाजच्या अटकेचा सापळा रचला व अखेर पोलिसांनी त्याला पाटणा येथून अटक केली.