काळेवाडी : स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार नसलेल्या काळात समाजाच्या मोठ्या विरोधाला न जुमानता क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या बरोबरीने सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा चालवली. त्यांच्यामुळे आज स्त्रीया पुरूषांच्या बरोबरने शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या या पहिल्या शाळेचे महाराष्ट्र शासनाने नूतनीकरण करणे गरजेचे आहे. असे मत माजी नगरसेविका ज्योती भारती यांनी येथे व्यक्त केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले यांचे विचार, दूरदृष्टी आणि योगदान यांचे स्मरण करणारा कार्यक्रम काळेवाडीत साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका ज्योती सुखलाल भारती मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्याप्रसंगी समाज प्रबोधनकार शारदा ताई मुंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर व अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी बहुसंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.