पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि कोरोना काळात अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या विविध अडचणीचा विचारात घेऊन शहरामध्ये प्रत्येक प्रभागात अत्याधुनिक सीएनजीच्या शव दाहिनी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात उभाराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली आहे.
आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना सचिन साठे मंगळवारी (दि. २९ मार्च) पत्र दिले. या पत्रात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात २५ लाखांपेक्षा जास्त विविध जाती धर्मांचे लोक वास्तव्यास आहेत. मनपा कार्यक्षेत्रातील या नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा पुरविणे, त्यासाठी जागा आरक्षित करणे हे मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ नुसार कायद्याने बंधनकारक आहे. या प्राथमिक सेवा सुविधांमध्ये वीज, पाणी, रस्ते या बरोबरच ‘स्मशानभुमी’ साठी जागा उपलब्ध करुन देणे हि देखील जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत भाटनगर, मिलिंदनगर (पिंपरी), निगडी, सांगवी आणि भोसरी येथे विद्युत दाहिनी आणि येथे डिझेल दाहिनी आहे. यातील विद्युत दाहिन्या अनेकदा किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली अनेकदा बंदच असतात. पर्यायाने अनेक वेळा मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना इच्छा नसतानाही लाकुड, गौ-या वापरुन अंत्यविधी करावा लागतो. हा प्रकार नागरिकांच्या भावनांचा अनादर केल्याप्रमाणे आहे. तसेच पर्यावरणाला देखील हानीकारक आहे.
शहरातील सर्व प्रभागात सीएनजी युक्त अत्याधुनिक शव दाहिनी उभारण्यात यावी. अशा अत्याधुनिक शव दाहिनींची अत्यंत निकड पिंपरी चिंचवड शहराला आहे. कोरोनाच्या काळात रोज वाढत जाणा-या मृत्यू संख्येमुळे शहरातील सर्वच स्मशानभुमीमध्ये नातेवाईकांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे अनेकदा नागरिकांना मृतदेह एका स्मशानभुमीतून दुस-या स्मशानभुमीत घेऊन जावा लागला आहे. अशी दयनीय अवस्था स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणवून घेणा-या शहराला शोभणारी नाही. सात हजार दोनशे कोटींचा आपल्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे. परंतू स्मशानभूमीच्या निकडीच्या विषयाकडे लक्ष द्यावे अशी इच्छा प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची ही दिसत नाही.
आयुक्त तथा प्रशासक आपण आपल्या अधिकारात पुढील आर्थिक वर्षात शहरातील सर्व प्रभागात पर्यावरणपुरक सीएनजी युक्त शवदाहिनी उभारण्यात याव्यात आणि नागरिकांच्या भावनांचा आदर करावा अशीही मागणी साठे यांनी या पत्रात केली आहे.