छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत हवा – कुंदाताई भिसे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत हवा - कुंदाताई भिसे
  • पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी

पिंपरी : शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करुन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी दिलेला एकतेचा वारसा नव्या पिढीने जतन केला पाहिजे. शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा आदर्श सर्वानीच घेतला पाहिजे. जगभरात ज्यांच्या कुशल राज्य कारभाराची ओळख आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत व्‍हावा, असे मत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, सखाराम ढाकणे, रमेश चाडगे, वटंमवार, वैद्य, वाणी, आणि अजित भिसे, स्वप्नील खोडदे, मयूर काळे, बालाजी पखाले व सोसायटी परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय भिसे म्हणाले, ” जेव्हा जेव्हा आपण शूर पराक्रमी राजांबद्दल बोलतो तेव्हा; आपल्या जिभेवर पहिले नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे येते. ज्यांनी मुघलांच्या आगमनानंतर देशातील हिंदू आणि मराठा संस्कृतीला नवे जीवन दिले. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. पराक्रमी, धाडसी आणि शूर शासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यगाथा महान आहे. प्रत्येकाने त्यांच्या गुणांचा अभ्यास करावा व त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करावा. “