
पुणे (लोकमराठी) : लॉकडाऊनमुळे संयम सुटलेल्या तळीरामांनी दारुसाठी बीअर बारची दुकाने फोडून दारुच्या बाटल्या पळवल्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्यात चक्क दुधाच्या टेम्पोतून दारुची ने-आण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून टेम्पोच्या चालकाला जेरबंद करण्यात आलं आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पोलिसांच्या गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत. पुण्यातील कात्रज घाटातही काल रात्रीपासून आज सकाळी ७ वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू होती. काल रात्री साडे अकरा वाजता 10MH12 JF6988 या क्रमांकाचा एक टेम्पो घाटातून जाताना पोलिसांना दिसला.
त्यामुळे पोलिसांनी या टेम्पो चालकाला थांबायला सांगितले आणि त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पोचालकाच्या बोलण्यावर पोलिसाला संशय आल्याने त्याला टेम्पो उघडून दाखविण्यास सांगितले. पोलिसांनी टेम्पोत घुसून दुधाचा प्रत्येक क्रेट तपासायला सुरुवात केली असता क्रेटच्या बाजूला बीअरचे १२ बॉक्स लपवलेले दिसले. २८ हजार ८०० रुपये किंमतीचे बीअरचे बॉक्स आढळून आल्याने पोलिसांनी तात्काळ टेम्पो चालकाला जेरबंद केले आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी मुद्देमालासह टेम्पोही जप्त केला असून दारुबंदी कायद्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत.
- PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उमेदवारांची यादी
- Mamurdi : मामुर्डीत सोसायटी पार्किंगमध्ये गांजा जप्त
- अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- Ahilyanagar : अश्विनी नांगरे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरव
