हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 रोजी काळेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे या ठिकाणी संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संगिताताई काळे, अमित झेंडे (सरपंच), योगेश काळे (ग्रामपंचायत सदस्य), श्रद्धाताई काळे दिवे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, एस एम जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सात दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रंजना जाधव यांनी ‘महिला सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून संगीताताई काळे उपस्थित होत्या. दिनकर मुरकुटे यांनी ‘हेरिटेज वॉक’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ.संजय जगताप उपस्थित होते. प्रा. ऋषिकेश खोडदे यांनी ‘औषधी वनस्पतींची शेती’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ.सरोज पांढरबळे उपस्थित होत्या. डॉ.ज्योती किरवे यांनी ‘पर्यावरण जागृती’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. स्वप्निल ढोरे यांनी ‘ग्रामीण बँकिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शिल्पा शितोळे उपस्थित होत्या.
सात दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर गटचर्चा केली. यामध्ये स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्याची 75 वर्ष काय गमावले काय कमावले, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता अभियान व योग इतर विषयांवर गटचर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनपर विविध पथनाट्याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक व देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून सामाजिक जनजागृती केली.
सात दिवसीय शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध समाज उपयोगी कार्य केले. यामध्ये गावातील स्वच्छता, शाळेच्या परिसरातील स्वच्छता, स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता, मल्हार गडावरील झाडांना पाणी देणे. प्लास्टिक व कचरा एकत्रित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियान, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, पर्यावरणाचे संवर्धन, व सामाजिक प्रबोधनावर गावातील लोकांना संदेश दिला. विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये सर्व स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे मूल्य एक लाख रुपयापर्यंत होईल इतक्या स्वरूपाचे आहे. सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन डॉ.रंजना जाधव, डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे, प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा.मोहनसिंग पाडवी, डॉ.अतुल चौरे, श्री.कारकर मामा, श्री.अनुप पवार यांनी केले. तसेच हे शिबिर संपन्न होण्यासाठी डॉ.किशोर काकडे, डॉ.संजय जडे, डॉ.संजय जगताप व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.