SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के

SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १३) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के लागला आहे. त्यामध्ये मुले ९५.४७ टक्के तर मुलींनी ९७.७७ टक्के मिळवून बाजी मारली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निकालाविषयी उत्कंठा दाटली होती. मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

शहरातुन दहावीच्या परिक्षेसाठी शहरातून १९,९१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये परीक्षेला एकूण १९,८६७ विद्यार्थी बसले होते. त्यामधून एकूण १९,४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ८३८३ विद्यार्थी डिस्टिंक्शन घेऊन पास झाले आहेत. प्रथम श्रेणीत ६,६८५ , द्वितीय श्रेणीत ३,५८७ , पास श्रेणीत ८१० पास झाले आहेत.

शहरातील तब्बल १२५ विविध माध्यमांच्या शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. तर चिखलीतील विष्णूपंत ताम्हाणे माध्यमिक विद्यालयाचा सर्वाधिक कमी ७६ टक्के मिळविले आहेत. पुर्नपरीक्षार्थी म्हणजे रिपिटरचा ७९.७८ टक्के निकाल लागला आहे. शहरातील २१३ शाळांमधून १० हजार ३३२ मुले तर ९ हजार ५८५ मुली अशी १९ हजार ९१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १० हजार २९६ मुले आणि ९ हजार ६७२ मुली अशा १९ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील १० हजार ४४ मुले तर ९ हजार ४२२ मुली असे एकूण १९ हजार ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४०२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.