पिंपरी : अखेर आज केंद्र सरकाने तीन काळे कृषी कायदे रद्द केले.हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे.भारताच्या लोकशाहीचाही हा ऐतिहासिक विजय आहे.आज संपूर्ण जगाला भारतातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले की, शांततापूर्ण व लोकशाहीमार्गाने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही.
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे शेतकरी आंदोलन सर्वात मोठे व दिर्घकाळ चाललेले आंदोलन होते.सरकारने आपली सर्व शक्ति पणाला लावून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा ध्यास घेतला होता.परंतू त्या दडपशाहीपुढे शेतकऱ्यांचा दृढनिश्चय अजिंक्य ठरला.या लढ्यात शेकडोंना प्राण गमवावे लागले.लाखो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणूनच हा संघर्ष भविष्यातील अनेक लोकशाहीविघातक शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कृषी कायदे मागे घेणे ही भाजपाची राजकीय खेळी असली तरी अंतिमत: भारतीय लोकशाहीचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रीया पिंपरी चिंचवडचे आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे.
दरम्यान हे काळे कायदे मागे घेतले जाणे हे शेतकरी आंदोलनाला आलेले यश असले तरी या निर्णयाची दुसरी बाजु महत्वाची आहे.सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे.तसेच उत्तर प्रदेशमधून अनेक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. म्हणून लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असलेल्या उत्तरप्रदेशमधील जनतेस दुखावणे भाजपा सरकारला या निवडणूकीच्या दृष्टीने महागात पडू शकते, याची पुरेपुर जाणीव होती. असेही बेंद्रे म्हणाले.