जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी

जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी

हडपसर – १२ नोव्हेंबर, प्रतिनिधी- डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते श्रीधर महादेव जोशी उर्फ एस. एम. जोशी यांची जयंती सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभागामार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, एस. एम. जोशी हे थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते होते. आपल्या प्रामाणिक आणि सात्विक व्यक्तिमत्त्वाने त्यांनी त्या काळातील अनेकांना सामाजिक कामाची प्रेरणा दिली. विद्यार्थी दशेत असताना ते महात्मा गांधी यांच्या चळवळीने प्रभावित झाले. काही विशिष्ट ध्येय, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. पुढे ते कामगार पुढारी ‘एसेम’ या नावाने लोकांमध्ये परिचित झाले. १ ९ ४८ साली ते महाराष्ट्राच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. एक साधे, प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते म्हणून एस. एम. जोशी प्रसिद्ध असून, विविध प्रकारच्या अन्यायाविरुद्ध परखडपणे लढा देण्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.

एस.एम. जोशी यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन, रयत शिक्षण संस्थेने, हडपसर येथील महाविद्यालयाला एस.एम. जोशी यांचे नाव दिले आहे. खरं तर आजचा दिवस हा एस. एम. जोशी यांच्या कार्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून एस.एम. जोशी यांच्यावरील ग्रंथ व लेख वाचून आजचा दिवस साजरा करावा. असे नम्र आवाहन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जडे, डॉ. संजय जगताप, डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. बाबासाहेब माळी, डॉ. निशा गोसावी, डॉ. मोहनसिंग पाडवी तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.