पिंपरी चिंचवड : कंपनीमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना महाळुंगे पोलीसांनी १२ तासात अटक केली. विशेष म्हणजे या चोरट्यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका भाजप नगरसेविकेच्या पतीदेवाचा समावेश आहे. तो अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत..
इम्रान शौकतअली बागवान (वय-19 वर्ष रा. पंचमोहनी ता.इटक जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), इम्रान मुस्तफा हुसेन ( वय-20 वर्ष रा. रमवापुर ता. तुलसीपुर जि.गौंडा उत्तरप्रदेश) आणि रणजित राजेंद्र चव्हाण ( वय-23 वर्ष रा. कंकरापाल, ता. केराकड जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर नगरसेविकेचा पती बापु घोलप (यमुनानगर, निगडी) आणि रशीद (भंगारवाला रा. चाकण) अशी फरार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अमोल प्रकाश डोबळे (वय-36 रा. सावरदरी, चाकण) यांनी फिर्याद दिली.
महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजे सावरदरी (ता. खेड जि. पुणे) येथील एअरसील टेक्नोलॉजी एलएलपी या कंपनीमध्ये (ता. २०) डिसेंबर २०२० ते (ता. २९) जानेवारी २०२१ या दरम्यान चोरी झाली होती. चोरट्यांनी कंपनीतील औष्णिक विद्युत केंद्राचे चंद्रपुर येथुन दुरुस्ती करीता आणलेल्या मशीन मधील गेअर बॉक्सच्या बारा बेअरींग पैकी २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सहा बेअरींग चोरुन नेल्या होत्या.
महाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी भेट दिल्यानंतर हि चोरी माहितगार व्यक्तीने केली असावी. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख दत्तात्रय गुऴीग व तपास पथक यांना या प्रकरणाचा जलद गतीने तपास करण्याच्या सुचना देण्यात आल्या. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आणि गोपणीय माहितीगाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडेक कसुन चौकशी केली.
सुरक्षा रक्षकाकडे चौकशी दरम्यान त्याने चोरी केली असल्याची कबुली देऊन चोरलेल्या सहा बेअरींग पैकी तीन बेअरींग दोन भंगारवाल्या दुकानदारांना विक्री केली असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या भंगारवाल्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्या चोरलेल्या बेअरींग फरार आरोपी बापु घोलप याला विक्री केल्या असल्याचे सांगितले. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी १२ तासाच्या आत या गुन्ह्याची उकल करुन पाच पैकी तीन आरोपींना अटक केली आहे..
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीक, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामण सांगडे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.