कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र केंद्र देशात एकमेव भोसरीत : देवेंद्र फडणवीस

कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र केंद्र देशात एकमेव भोसरीत : देवेंद्र फडणवीस
  • भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

पिंपरी, ता. ७ : कुस्ती, कबड्डी सारखे देशी खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ करतात आणि त्यातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र प्रशिक्षण केंद्र देशात एकमेव भोसरीत उभारण्यात आले याचा आम्हाला अभिमान आहे. मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली त्या हे मोठे काम आहे. महापौर, आमदार, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक हे अभिनंदनास पात्र आहेत. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि देशाचे तसेच भोसरीचे नाव जगात मोठे करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी व्यक्त केला.

भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन रविवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फडणवीस यांनी भोसरी पंचक्रोशीतील दिवंगत पैलवान व वस्ताद यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उपस्थित पैलवान वस्ताद यांचा सन्मानाने आदराने उल्लेख केला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे होत्या. प्रमुख पाहुणे भाजपा शहर अध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रथम महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, पक्षनेते नामदेव ढाके, ‘ई’ प्रभाग विभाग विकास डोळस, स्थानिक नगरसेवक संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भिमाताई फुगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदींसह नगरसेवक, नगरसेविका तसेच शहरातील कुस्ती शौकीन व वस्ताद उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, भोसरी गावजत्रा मैदाना शेजारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे भव्यदिव्य देशातील दुसरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. यापुर्वी पतियाळा येथे असे केंद्र उभारण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी ८६०० चौरस मीटरच्या जागेत ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युवा पैलवानांना सराव करता येईल यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

स्वागत आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आणि आभार विजय फुगे यांनी मानले.