बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा – अल्लाउद्दीन शेख

बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा - अल्लाउद्दीन शेख

पनवेल (रायगड) : बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय देत रक्तदान करुन साजरी करण्याचा मानवतावादी दृष्टिकोन आनंद देणारा आहे. असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्र कार्यवाह अल्लाउद्दीन शेख यांनी येथे केले.

आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. म्हणूनच ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती’, शाखा पनवेलच्या पुढाकाराने व ‘राष्ट्र सेवा दल’, ‘हुसेनी फाउंडेशन’ याच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अल्लाउद्दीन शेख बोलत होते.

रक्तदान हे सर्व जाती धर्मापलीकडे माणसाला माणसाशी जोडते. रक्तदान करुन बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत भर पावसात अनेकांनी घराबाहेर पडून रक्तदान केले. युसूफ मेहेर अली सेंटर ताराचे संतोष ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रक्तदान केले. महाराष्ट्र अंनिस रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी मनोहर तांडेल, प्रभाकर नाईक आणि पनवेल शाखेतील कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी रक्तदान केलं. शिबिराची पोस्ट वाचूनही काही नवीन साथी रक्तदानासाठी उपस्थित राहिले.

यावेळी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाला जादुटोणा विरोधी कायदा पत्रिका देण्यात आली. तसेच सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्ताने एकाच वेळी २५ जणांनी रक्तदान केले, खूप पाऊस असतानाही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Actions

Selected media actions