यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा
  • महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ
  • यंदाची वारी ऐतिहासिक ठरणार .महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा मिळणार

पुणे : महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संकल्पना असलेल्या ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती. यामध्ये…

१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.

२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.

३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.

अशा सुविधा पुरविण्याबाबत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनास निर्देश देण्यात आलेले होते व या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्यवारी या संकल्पनेला अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मनःपूर्वक अभिनंदन. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे असं म्हणता येईल.

या आरोग्यवारी उपक्रमाचा आरंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे दि.१९ जून रोजी दुपारी १२.३० वा. होत असून या कार्यक्रमाच्या उदघाटनाला राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण या उपस्थित राहणार आहेत.