लोकमराठी न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय.
अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.
इंजिनीअर पदावर कार्यरत असणाऱ्या रिंकी आणि पिंकी जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघी एकमेकींसोबत वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत सप्तपदी घेतली.