उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले
  • दिव्यांगांच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन सदैव प्रयत्नशील – डॉ. कुंदाताई भिसे

पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) : स्व. राहुल शामराव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू ओंकार जोशी आणि पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र येथे विशेष (दिव्यांग) मुलांच्या माता आणि भगिनींसाठी नुकतेच विनामूल्य एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीस पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत मोठ्या संख्यने विशेष मुलांच्या माता आणि भगिनींनी संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषणमुक्त वातावरणात आणि आनंदात घालवला. तसेच तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली.

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, ओंकार जोशी, अंजनवेल कृषी पर्यटनचे राहुल जगताप, सप्तर्षी फॉउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, सौ. रुषाली बोरसे, रमेश वाणी, कल्पना बागुल, आकाश जगताप, ज्योती आगरकर आणि दिव्यांग मुलांचे पालक यांची सहलीस उपस्थित होती.

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, विशेष (दिव्यांग) मुलांच्या आई व वडीलांवर विशेष मुलांना सांभाळण्याची मुख्यत्वे जबाबदारी असते. त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांना स्वतःसाठी एक दिवस मुक्तपणे संवाद व संचार करण्यासाठी मिळावा म्हणून या सहलीचे आयोजन अंजनवेल कृषी पर्यटन येथे करण्यात आले होते. या सहलीचा पुरेपूर आनंद घेत मनातले दडपण आणि काळजी यांना मोकळी वाट करून दिली. तसेच पालकांना स्वतःकडे वेळ देऊन समाजातील चालल्या गोष्टी आत्मसात करण्याचा सल्ला दिला. दिव्यांग बांधवांच्या व पालकांच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन सदैव प्रयत्न करत राहील, असे आश्वासन दिले.

आयोजक ओंकार जोशी म्हणाले, वर्षातले ३६५ दिवस कुटुंबासाठी देत असताना पालकांनी एखादा दिवस तरी स्वतःसाठी द्यावा. त्यामुळे मन आनंदी आणि ताजेतवाने होऊन पुढील आवाहनांचा सामना करण्यास सज्ज होते.

या सहलीचे व्यवस्थापन सप्तर्षी फॉउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, सौ. रुषाली बोरसे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ढगे यांनी केले. विशेष (दिव्यांग) मुलांच्या माता व भगिनी यांनी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदाताई भिसे यांचे मनापासून आभार मानले.