कर्जत नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड

कर्जत, दि. १६ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली असल्याची पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी जाहीर केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मुखाधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी दि. ९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा अक्षय राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. सदरचा अर्ज वैध ठरला असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली होती. मात्र १६ रोजी नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत निवड जाहीर होणार होती. बुधवार, दि १६ रोजी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी लोकानियुक्त सर्व नगरसेवकांची बैठक घेत कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची निवड जाहीर करताच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. 

यावेळी सर्व नुतन पदाधिकार्याची शहरात मिरवणूक काढून श्री. संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.कर्जत शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी  स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही उषा राऊत आणि रोहिणी घुले यांनी दिली.