पिंपरी : सामाजिक कार्यकर्ते व निर्भया महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे हे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३३ मधून इच्छुक आहेत. त्यानिमित्त नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जगताप डेअरीमधील पखवान हॉटेल येथे मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उल्हास कोकणे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत झाले.
त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह विविध सामाजिक मंडळाचे व लायन्स क्लबचे पदाधिकारी, रहिवासी सोसायटीतील नागरिक व समस्त रहाटणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना उल्हास कोकणे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे पद माझ्याकडे नसताना विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. नागरिक व विशेष करून महिलांच्या रोजगारासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्भया महिला मंचच्या माध्यमातून बहुसंख्य कामे केलेली आहेत. रक्तदान शिबीरे, कोरोना काळात गरजूंना अन्नदान, किराणा व भाजीपाला वाटप केला असून अनेकांना बेड उपलब्ध करून दिले, अशा प्रकारे सर्वसामान्यांसह प्राण्यांसाठीही केलेली मदत नागरिक विसरलेले नाहीत. माझी सर्व कामे लोकांना माहित आहेत. सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन मी आज पर्यंत काम करत आलो आहे त्यामुळे मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना रहाटणी परिसरातील नागरिकांन पुढे जाताना संकोच बाळगण्याची वेळ येणार नाही.
उल्हास कोकणे पुढे म्हणाले की, यावेळी संधी मिळाल्यास रहाटणीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी तन-मन-धनाने स्वत:ला वाहून घेईल. सर्वांना बरोबर घेऊन नागरिकांना मुलभूत सुख-सोयी व त्यांच्या अत्यावश्यक गरजांची पुर्णतः करण्याचा माझा प्राधान्यक्रम असेल. असा ठाम विश्वास यावेळी उल्हास कोकणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रत्येक वेळी नागरिक लोकप्रतिनिधी निवडताना त्यांच्याकडून अनेक अपेक्षा करतात. मात्र, त्यांची निराशा होते. त्यामुळे यावेळी उल्हास कोकणे यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी व युवा नेतृत्वाला संधी देण्याचा रहाटणीकरांनी निर्धार केला असल्याचे दिसून आले. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.