कर्जत तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न

कर्जत तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यात तहसील कार्यालय अंतर्गत अहमदनगर जिल्हा पालक मंत्री यांचे शिफारशीनुसार नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नुकतीच गठीत करण्यात आली. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून तहसीलदार कर्जत यांनी संजय गांधी निराधार समितीसमोर मंजूरीचे कार्यवाहीसाठी ठेवणेत यावेत अशी तरतूद आहे.

यास्तव १४ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. प्रथमत: बैठकीस उपस्थित समिती अध्यक्ष व सदस्य यांचे तहसीलदार कर्जत यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे १५२ अर्ज मंजूर झाले व श्रावणबाळ योजनेचे १४४ अर्ज मंजूर, तर ५६ अर्ज नामंजूर झाले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे २८ अर्ज मंजूर व २९ अर्ज नामंजूर झाले आहेत. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे १५ अर्ज मंजूर झाले. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या ३४ पात्र लाभार्थ्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात लंकाबाई अजिनाथ परहर यांना समिती अध्यक्ष व सदस्य यांचे हस्ते रक्कम रु. २० हजारांचा धनादेशाचे वाटप करण्यात आले असून उर्वरित ३३ लाभार्थी यांना एकूण रक्कम ६ लाख ६० हजार धनादेशाद्वारे वर्ग करणेत आले आहेत.

या बैठकीस अमृत खराडे (गुरुजी) अध्यक्ष, भाऊसाहेब गाडे, रामकिसन साळवे, बळीराम यादव, बापूसाहेब नेटके इत्यादी अशासकीय सदस्य तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत हे शासकीय सदस्य तर तहसीलदार तथा सदस्य सचिव

नानासाहेब आगळे उपस्थित होते. त्याचबरोबर प्रकाश मोरे, ना. तह. (सं.गां.यो.), बापूसाहेब सूर्यवंशी (अ.का.), मानसी निंबाळकर (अ.का.) तसेच विनायक सुरवसे आदी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात विशेष सहाय्य योजना मोहीम १ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आलेली असून मार्च २०२२ या महिन्यात होणाऱ्या पुढील बैठकीत प्राप्त अर्जावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसिलदार कर्जत यांनी सांगितले.