पिंपरी : काळेवाडीतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या नित्याच्याच आहे. मात्र, विजयनगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असून अनेक सदनिकाधारक आपली सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. तर काहींनी सदनिका विकल्या असल्याची माहिती पुढे येत आहे.
काळेवाडीतील विजयनगर परिसरात अनेक सोसायट्या असून या सोसायट्यांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यात कमी दाबाने व दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे या सोसायट्यांना टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. याबाबत महापालिकेला सांगूनही दखल घेतली जात नाही. परिणामी अनेक सदनिकाधारक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान, काळेवाडीतील विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर कोकाणेनगर, जमा मस्जिद परिसरात देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परिसरात राहणारे नागरिक या त्रासाला सामोरे जात असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कनिष्ठ अभियंता यांना याबाबत आम्ही वारंवार माहिती दिली. परंतु कोणताही ठोस निर्णय घेण्यास पाणीपुरवठा विभाग असमर्थ आहे. विजयनगर परिसरात असलेल्या १६ इंची जलवाहिनीला व्हॉल्व्ह बसविण्यास पाण्याचा प्रेशर वाढेल व काही प्रमाणात या ठिकाणी राहणारे सदनिकाधरकांना मदत होईल, असे सुचवले. मात्र, यासंदर्भात पाणीपुरवठा विभाग मौन धरण करून आहे.
– इरफान शेख, सामाजिक कार्यकर्ते
महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व टँकर व्यावसायिक यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुद्दामून काळेवाडीतील सोसायटी भागात पाणी टंचाई निर्माण केली जात आहे.
– सुनिल पालकर, सामाजिक कार्यकर्ते
विजयनगर भागात सोसायट्यांमध्ये एका कुटूंबाला आवश्यक आहे, तेवढे पाणी महापालिकेकडून मिळत नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होते. दिवसाआड ऐवजी दररोज एकवेळ पाणीपुरवठा सुरू केल्यास काही प्रमाणात पाण्याची समस्या दूर होईल.
– सुशील मिरगल, सदनिकाधारक