झुंडीचे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे आणि हे काम महाराष्ट्रातील सक्षम स्त्रिया एकत्र येऊन करू शकतात!

झुंडीचे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे आणि हे काम महाराष्ट्रातील सक्षम स्त्रिया एकत्र येऊन करू शकतात!

शीतल करदेकर

झुंडशाही ही जातिभेद, लिंगभेद ,आर्थिक विषमता ,धार्मिक विद्वेष कशा कशात नाही? या झुंडवादी प्रवृत्ती व प्रस्थापितांना धक्के देताना, आपले स्थान निर्माण करताना रडावं नाही तर लढावं लागतं! ही लढाई आत्मसन्मानाची आपली गुणवत्ता सिद्ध करत ,समाजात स्थान मिळवण्याची असते !ताठ मानेने जगण्याच्या हक्काची असते!

झुंड चित्रपटाबद्दल सगळेच भरभरून बोलत आहेत! बाजूंने- विरोधात सगळेच काही जोरदार सुरू आहे ! त्यात मोठा गट सोईने गप्प! काहीजण हात धुवून घेत आहेत! प्रसिद्धीची किंमत खूप मोठी असते! विषयाशी याचं काही घेणं देणं नसते असे हे मुखवटेबाज!

नागराज मंजुळे विषय चांगला घेतला आहे !हा चित्रपट विजय बारसे या झोपडपट्टीतील मुलांसाठी फुटबॉल प्रशिक्षणाची समाजसेवी संस्था सुरु करणाऱ्या खऱ्याखुऱ्या हिरोची आहे! हीच भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे!

जातीव्यवस्था आणि त्यातून होणारे अत्याचार शोषण त्यातले बारकावे मंजुळे छानपणे टिपतात आणि कोणताही मुलामा न देता अतिवास्तववादी चित्रण टापटीपपणे आपल्यासमोर आणतात ! फॅन्ड्री हा चित्रपट जास्त लक्षात राहिलाय!

झुंड प्रवृत्ती विरोधातील हा एक लढा आहे! या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांना प्रमुख भूमिका का दिली यावर एका अभिनेत्रीने प्रश्न विचारला, त्यावर सर्वांनी शाब्दिक आक्रमण केले! दुसरीकडे आपण म्हणतो की प्रस्थापितांच्या राज्यांमध्ये आपले स्थान निर्माण करताना मागे राहिलेल्या समाजाला अनेक कारणांनी संधी मिळत नाही आणि आपलं स्थान निर्माण करता येते नाही !जात व्यवस्था ही काही कारणाने बंद करता होत नाही ! झुंडशाही ही दुसऱ्यावरील, विशेषत: आपल्यापेक्षा कंमकुवत दुसऱ्यावरील वर्चस्वासाठी, स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी प्रस्थापित होते!

झुंडच्या निमित्ताने, आज जागतिक महिला दिनाच्या विशेष दिवशी लिहावेसे वाटले;ते समाजातील सर्व क्षेत्रातील झुंड , पुंड, माजोरड्या गुंडाबद्दल! हो गुंडच! हे हातात सुरेचाकू , तलवारी , बंदुका घेऊन आपल्याला दिसत नाहीत, मात्र त्यांचा खोटे मुखवटे समाजात वावरताना दिसतात. त्यांची मुलामी भाषा समाजावर, विशिष्ट गटावर प्रभाव पाडत असते , विशिष्ट अविचारी कृती करण्यास प्रवृत्त करत असते!

अगदी श्रीकृष्णापासून आपण उदाहरण पाहिले आहे की राजा असतानाही त्यांनी सर्वसामान्यांसाठी विचार व कृती केली! आम्ही दहीहंडीची दुकानं लावतो! स्त्री सन्मान १६ सहस्र महिलांना त्यांनी दिला! तो विसरतो! आम्ही छत्रपती शिवरायांचा आदर्श मानतो!

शिवरायांनी माता भगिनींच्या रक्षणासाठी, स्व जनांसाठी स्वराज्याचे महान कार्य हाती घेतले ,त्याचे बाळकडू मातोश्री जिजाऊकडून मिळाले!

… आणि जिजाऊंचे महत्त्व एक स्त्री म्हणून कमी करता येते का? तर नाहीच! महाराष्ट्रामध्ये काहीना काही कारणाने वाद तयार करणे, जिजाऊंचा अपमान करणे असे प्रकार होत आलेले आहेत!

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल जे उद्गार काढले ते आक्षेपार्ह आहेतच! त्याचबरोबर क्रांती ज्योती रमाबाई बद्दलचे उद्गार हेही निंदनीय आहेत. वर्णव्यवस्थेत जातिव्यवस्थेच्या रचनेत स्त्रियांनाही नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे !

अनेक हक्क मिळवण्यासाठी स्त्रियांनाही नेहमीच लढावे लागलेले आहे! आजही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपण खरोखरच स्त्री सक्षमीकरणासाठी, तशी मानसिकता तयार करण्यासाठी ,अत्याचार थांबवण्यासाठी आणि स्त्री पुरुष समानता देण्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखतो का? समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतील अशी सरकारी यंत्रणा आपल्याकडे आहे का? असलीच तर पारदर्शकपणे सगळे लाभ लोकांपर्यंत पोचते होतात का हा अभ्यासाचा विषय नाही तर, तो मोठ्या आंदोलनाचा विषय आहे !

सत्तेत असलेल्या प्रशासकांना अचूक वेळी ,अचूक कृती करण्याचे भान नसेल आणि प्रशासनावर नियंत्रण नसेल तर अनेक महत्त्वाचे विषय हातून सुटून जातात!

तसेच प्रकार महिलाचे सन्मानाबाबत घडताना दिसतात!आजही आपण खैरलांजी,कोपर्डी विसरलेलो नाही. नेहमीच राजकीय स्वार्थ, वर्चस्व, जातीयवाद यांच्या लढाई बाईचा बळी गेलेला आहे!

महिला हितासाठी चे विषय नेहमीच मागे राहिले आहेत! विषय महिल , महिला धोरण, महिलांविषयी चे कायदे यांच्या सक्षमीकरणाचा आणि कृतिशील कार्यवाहीचा आहे!

आजही सरकारच्या अनेक योजना खरोखरच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत! माध्यमांतून त्याचे पडसाद अवचितपणे उमटतात! माध्यमांची तर इतकी वाईट अवस्था ,फरफट झालेली आहे

वर्तमानात लिंगभेद आणि वर्चस्वासाठी स्त्रियांची बदनामी, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांचा सोयीने होणारा उपयोग, त्यांच्याकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची विकृत मानसिकता हे प्रश्न अत्यंत प्रखर आहेत!यासाठी केवळ महिला धोरण लिखित स्वरूपात तयार करून भागणार नाही ,नि सत्कार सन्मान करून भागणार नाही तर, त्यासाठी महाराष्ट्रभरातील कृतिशील महिला, पुरुष, सामाजिक संस्था यांना एकत्र येण्याची गरज आहे! आणि पूर्वीच्या काळी जसे राजे-महाराजे ; विद्वान आणि गुणीजणांना राजाश्रय देत होते ,त्याप्रमाणे गुणीजन आणि त्या क्षेत्रातील तज्ञ, संस्था यांच्यासोबत तरुणांची एक फळी तयार करून जागृती आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना काय करायचे याचा आराखडा तयार करून अशा एका मजबूत व्यक्तींच्या हाती काम देण्याची गरज आहे!

केवळ मोठमोठी साहित्य संमेलन ,नाट्य संमेलन ,कार्यक्रम यासाठी मोठे खर्च करण्यापेक्षा ,प्रत्येक जिल्हा स्तरावर जागरूक नागरिकांची फळी तयार करून त्यात विशेषतः महिलांना स्थान देऊन हे कृतिशील कार्य गतीमान करायला हवे!

येथे प्रकर्षाने उल्लेखित करावेसे वाटते ते, जातीभेद वर्णभेद लिंगभेद याच्या पलीकडे जाताना आपण प्रस्थापितांच्या गटात गेल्यावर, आपल्याला थोडी ताकद मिळाल्यावर आपण पुन्हा पूर्वीच्या प्रस्थापितांच्या रांगेत बसत नाही ना? याचा विचार नक्कीच झाला पाहिजे! उद्या आपल्यावर हे कोणीतरी दगड मारण्यास तयार आहे हे विसरून चालणार नाही!

जाती व्यवस्थेतील मोठा दगड एका अंगाने दूर होणार नाही तर दोन्ही अंगाने दूर करण्याची दगड गरज आहे! जात नाही ती जात ,असे म्हणतात, ते यासाठीच! दुसऱ्याने आपली जात ,आपल्याला कमी मानू नये, मग आपणही आपल्या जातीचा उल्लेख करणे सोडून द्यावे असाच विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे ! त्याच प्रमाणे महिलांना समाजात समान स्थान देताना तिला माणूस म्हणून जगू देताना, ती फक्त उपभोग्य वस्तू आहे, दुय्यम वस्तू आहे हे समाजातील प्रत्येक स्तरातील माणूस मनापासून करणार नाही तोपर्यंत राजकारणाच्या पटावर समाजकारणाच्या गर्दीत, जातीय राजकारणात आणि आर्थिक स्तरावर मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं बळी जाताना दिसेल! त्यांचे वारंवार चारित्र्यहनन होत राहील !

त्यावर नियंत्रणासाठी आपल्याकडे कायदे आहे, न्यायालय आहेत, पोलिस यंत्रणा आहे! वेगवेगळ्या जाती ,त्यांचे झेंडे घेणारे नेते आहेत! श्रेयासाठी लढणारे नेते आहेत, महिलाही आहेत!

या विषयात पुण्याच्या आत्महत्या केलेल्या मुलीचा उल्लेख करावा लागेल! तिने आत्महत्या केल्यानंतर एका मंत्र्यावर आरोप होताना जे ऑडिओ मेसेज व्हायरल झाले ,त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला …पुढे काय झालं ? त्या मुलीचा चेहरा नावासकट अनेक वृत्तवाहिन्यानी दाखवला गेला! तिच्या नावाची मरणानंतर बदनामी झाली. तसाच प्रकार आता गाजतोय, माध्यमातून चर्चेत आहे!

देशाचे केंद्रीय मंत्री मा नारायण राणेजी, त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीरपणे माध्यमांतून त्या मुलीचे नाव घेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला,हत्या झाली असे वारंवार सांगितले; त्याबाबत नंतर तक्रार दाखल झाली.

न्यायालयाने त्यांना अटक करू नये म्हणून सांगितले !आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, पैसा आहे पद आहे आणि सत्ता आहे म्हणून*जाहीरपणे पीडित मुलीची नावे घेणे आणि त्यांचा अपमान करणे हे न्यायालयाला तरी पटते का?ते कायद्यात बसते का? असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला विचारू शकत नाहीत, कारण लढण्यासाठी आणि बोलण्यासाठी आमच्या मागे ना पैसा आहे ना कोणती शक्ती!

मात्र वर्तमानात महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते पाहता खरोखरच प्रखर अशा समाजसुधारणेची ,चळवळीची गरज या पुरोगामी महाराष्ट्राला आहे! आपण कलाकार म्हणून, साहित्यिक म्हणून ,पत्रकार म्हणून आणि महिला म्हणून कोणत्याही राजकीय पक्षात नसलो तरी, जातिभेद आणि स्त्री पुरुष समानता यासाठी बोलण्याचे, काम करण्याची गरज आहे!

जी वेळ दुसऱ्यांच्या मुलीवर येते ती वेळ कदाचित आपल्यावर येऊ शकते आणि म्हणूनच फक्त एक दिवस महिला दिन साजरा करून, त्यांचे गोडवे गाऊन काही होणार नाही, जातीचे झेंडा उचलून काही होणार नाही तर, आज एक असे नेतृत्व आम्हाला हवे की जे सर्व समानतेसाठी सर्व हक्कासाठी काम करेल!

माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आजही आमच्या तळागाळापर्यंत झिरपलेली नाही! शाहू-फुले-आंबेडकर आम्हाला कळले नाहीत!

ज्या सावित्रीने खऱ्या प्रगतीसाठी शिक्षणाचा वसा दिला, तो नक्की कसा वापरावा हे आम्हाला कळत नाही, ही मोठी चिंताजनक बाब आहे! अनेक गिधाडं,गेंडे झुंडीच्या रुपात समाजात सर्व क्षेत्रात वावरतात. चित्रपटात , नाटकात त्यांची चित्रीकरण होतात, आम्ही टाळ्या वाजवतो आणि विसरून जातो!

झुंडी विरुद्ध लढणारे मग नंतर प्रस्थापितांत जातात आणि पुन्हा त्याच्या झुंडी तयार होतात हे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे आणि हे काम महाराष्ट्रातील सक्षम स्त्रिया एकत्र येऊन करू शकतात!हे जर घडलं नाही तर आमचं काही खरं नाही!

समाजात मुखवटे घातलेले गुंड अक्राळविक्राळ झुंडी आणि ड्रॅक्युला आपले शोषण करत राहतील! आपल्याला चुकीच्या मार्गाने फरफटत नेत राहतील आणि आम्ही फक्त त्यांचा जिंदाबाद, मुर्दाबाद करण्यासाठी अनेक गटात विखुरले राहू !खरच काही खरं नाही आमचं