पिंपरी : पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमूळे संपूर्ण शहरात जुलै पासून नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत. त्यामुळे डेंगी आणि साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केली आहे. याबाबत शहराध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिथे तक्रार केली जाते तेवढ्याच भागात महापालिकेच्या वतीने फवारणी केली जाते. खर तर पावसाळ्यात प्रत्येक प्रभागात सरसकट धुराची गाडी, व फवारणी केले जाणे आवश्यक असून या बाबतीत महापालिका प्रशासन उदासीन दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमूळे संपूर्ण शहरात जुलै पासून नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत.
डेंगी, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखीला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची साथरोग प्रतिबंधक मोहीम हाती घेतलेली नाही. अशी मोहिम राबवून डास उत्पत्ती ठिकाणे, पाणथळ जागा यांचे सर्वेक्षण वार्ड स्तरावर केले नाही. त्यामुळे शहरातील मनपाचे दवाखाने खाजगी दवाखाने येथे रुग्णाची गर्दी वाढत आहे. या निवेदनाद्वारे इम्रान शेख यांनी महापालिका आयुक्तांचे या बाबतीत लक्ष वेधले.
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील सर्व प्रभागात औषध फवारणी करावी. कोरोना काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजनचे प्रभावी मॉडेल वापरावे, ओपीडी मध्ये तातडीने अतिरिक्त आरोग्य कर्मचारी नेमून जिजाऊ मोहल्ला कमिटी संकल्पना त्वरित राबवावी, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे विकेंद्रीकरण होऊन नागरिकांना त्यांच्या निवासी क्षेत्रात मोफत उपचार मिळतील. औषधे आणि इंजेक्शन्ससाठी विशेष आर्थिक तरतूद करून तुटवडा निर्माण होणार नाही याचे व्यवस्थापन करावे. अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, उपाध्यक्ष लवकुश यादव, सरचिटणीस दीपक गुप्ता, सचिव ओम शिरसागर सचिन कोडग व इतर पदाधिकारी उपस्थित होते.