रेबीज लसीअभावी कुत्री हिंसक

पिंपरी चिंचवड मध्ये नुकताच 25 जणांवर हल्ला

रेबीज लसीअभावी कुत्री हिंसकपिंपरी (लोक मराठी ) : कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते. मात्र, भटक्‍या कुत्र्यांना निर्बीजीकरण केल्यानंतर पुन्हा ही लस दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये रेबीजचे संक्रमण होऊन हिंसक बनतात. प्राणी व माणसावर हल्ला चढवितात. यासाठी त्यांना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे, तरच ही समस्या आटोक्‍यात येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसह महापालिकेचे डोकेदुखी बनली आहे. त्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी महापालिका निर्बीजीकरण करते. दर तीन दिवसांनी दहा कुत्रे पकडून निर्बीजीकरण केले जाते. कुत्रा असेल तर त्याला तीन आणि कुत्री असेल तर पाच दिवस निर्बीजीकरणानंतर उपचारासाठी दवाखान्यात ठेवले जाते. वर्षभरात ७ हजार ६९३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. त्यासाठी वर्षाला सुमारे ५५ लाख १ हजार ४५ रुपये खर्च होत आहे; पण समस्या ‘जैसे थे’ आहे.

हे आहेत उपाय
दरवर्षी भटक्‍या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ही लस एक वर्ष उपयोगी असते. त्यामुळे पुन्हा त्यांचे लसीकरण करावे लागते. त्या साठी त्यांचा शोध घ्यायला हवा. ओळख पटण्यासाठी त्यांच्या गळ्यात विशिष्ट प्रकाराचा बिल्ला बांधावा. तरच त्यांचे नियमित लसीकरण करणे शक्‍य होईल; पण पशुवैद्यकीय विभागाकडे ‘डॉग स्कॉड’ची कमतरता आहे. त्यासाठी नवीन आठ वाहनांची गरज भासत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रेबीजविषयक नोंद नाही
महापालिकेच्या वैद्यकीय अहवालानुसार शहरात श्‍वानदंशाच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे; पण रेबीजमुळे मृत्यू झालेले, रेबीजची लागण झालेले कुत्रे, याची माहितीच वैद्यकीय विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाकडे नाही.

पकडलेले कुत्रे तीन दिवस ठेवण्यासाठी शेड बांधले जात आहेत. रेबीज प्रतिबंधक लस मुबलक आहेत. भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

कायदा काय सांगतो?
पिल्ले असलेली मादी व पिल्लांना सहा महिने पकडता येत नाही
निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व उपचारांव्यतिरिक्त पकडता येत नाही

येथे आहेत दवाखाने
शहरातील पशुवैद्यकीय दवाखाने कामगार भवन इमारत, गांधीनगर, पिंपरी
महापालिकेचा जलतरण तलाव इमारत, आकुर्डी प्राधिकरण