अहमदनगर : कर्जत पोलीस उपविभागातील भरोसा सेल कडून अनेक दांपत्य आणि पीडित पुरुष व महिलांचे समुपदेशनाद्वारे संसार सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून या भरोसा सेल मुळे अनेकांचे प्रपंच मार्गाला लागले आहे. यात कर्जत उपविभागात एकूण ७२ प्रकरणात समझोता होऊन त्यांच्या आयुष्याच्या निसटलेल्या रेशीमगाठी पुन्हा घट्ट झाल्याने कुटूंबासह नातेवाईकांतही समाधानाचे वातावरण आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पोलीस उपविभागासाठी भरोसा सेलसह या सेलचे अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामीण भागाच्या अडचणी पाहता कर्जत जामखेड पोलीस ठाण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी खेडोपाडी तात्काळ पोहचण्यासाठी चार दुचाकी दोन चार चाकी(योद्धा वाहने)कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली.यामुळे महिलांच्या तक्रारीकामी याद्वारे थेट मदत मिळते आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार पवार यांची संकल्पना
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यासाठी व रस्तालुट थांबविण्यासाठी परराज्यातील जोडल्या जाणाऱ्या महामार्गावरील रस्तालुट रोखण्यासाठी जागा शोधून अध्यवत पोलीस चार चौक्या स्थापीत करण्यात आल्या.त्यामुळे रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली. परराज्यातील वाहन चालकांना सुरक्षा वाटू लागली. तसेच मतदार संघातील संवेदनशील गावे आणि ठिकाणी सीसीटी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले. तसेच आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी ग्रामसुरक्षा दल यंत्रणेच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांना मोबाईल फोनद्वारे संदेश देऊन येणाऱ्या संकटात तात्काळ मदत मिळून अनेक ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या,दरोड्यांना आळा घालण्यासाठी ही यंत्रणा अंत्यत प्रभावी ठरली आहे.
अशी झाली भरोसा सेलची सुरूवात
महिलांच्या अडचणींसाठी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून भरोसा सेल सुरू झाल्याने महिलांकडून या सेल उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी कर्जत उपविभागात कौटुंबिक हिंसाचार आणि कलहामुळे विभक्त दांपत्यांना समुपदेशनासाठी पिडीत आणि अन्यायग्रसतांना न्याय मिळवून देण्यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस दल आणि कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत पोलीस उपविभागासाठी कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, बेलवंडी या पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार न्याय प्रतिक्षेत असणाऱ्या विभक्त पती-पत्नीसाठी कर्जत पोलिस ठाण्याच्या इमारतीत भरोसा सेल स्थापन करण्यात आले.
यापूर्वी अशा प्रकारची सर्व प्रकरणे अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सोडवली जात असे व न मिटणाऱ्या प्रकरणांना संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असे परंतु प्रायोगिक तत्वावर कर्जत पोलिस उपविभागात भरोसा सेल स्थापन केल्याने कर्जत, जामखेड ,श्रीगोंदा, बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कौटुंबिक हिंसाचार आणि कलहाने पीडित महिलांना कर्जत येथील भरोसा सेलचा मोठा आधार मिळाला आहे. अनेकांच्या संसाराची गाडी या भरोसा सेल मुळे सुरळीत मार्गाला लागली आहे. यामुळे प्रथमच महाराष्ट्रात उपविभागीय स्तरावर असणाऱ्या भरोसा सेलचे कार्य उत्तमरीत्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे या भरोसा सेल मध्ये सर्व प्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरिता पोलीस विधी अधिकारी संरक्षण अधिकारी मानसोपचार तज्ञ समुपदेशक हे उपलब्ध असतात या सेलच्या माध्यमातून बळी पडलेल्या व्यक्तीच्या मानसिकते चा विचार करून तिचे समुपदेशक कायदेशीर सल्लागार व वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने योग्य ते समुपदेशन केले जाते भरोसा सेल मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी मधील पीडितेला जोपर्यंत न्याय मिळत नाही किंवा तिचे योग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय एकतर्फी घेतला जात नाही या भरोसा सेलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकाराच्या हिंसाचारास बळी पडलेल्या महिला मुलांना अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी मानसिक बल प्राप्त होते तसेच सामाजिक सलोखा व सुरक्षित समाजासाठी पुरुष व महिलांना यांच्या कौटुंबिक वाद आणि कलहामध्ये योग्य समुपदेशन झाल्यास महिलांना व मुलांना समाजामध्ये एक सुरक्षित स्थान निर्माण करता येते
भरोसा सेलकडे १२५ अर्ज प्राप्त
दिनांक २६ जानेवारी ते ३१ ऑगस्ट अखेर कौटुंबिक कलहाचे एकूण १२५ अर्ज प्राप्त झाली होती त्यापैकी उपविभागात एकूण १०३ अर्जाची निर्गती झाली आहे. यात सर्वांचे संसार व्यवस्थित मार्गाला लागले असून अपवादाने काही कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात कर्जत उपविभागात एकूण ७२ प्रकरणात समझोता होऊन संसार मार्गाला लागले आहेत. १२ प्रकरणात स्वतंत्र निर्णय तसेच समझोता न झाल्याने कौटुंबिक हिंसाचाराचे एकूण १९ गुन्हे दाखल झाले आहेत.
या भरोसा सेल मध्ये कर्जत येथील कार्यालयात महिला पोलीस नाईक वनमाला तोरडमल आणि रोहिणी तोरडमल या अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि कर्जत जामखेड श्रीगोंदा बेलवंडी येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी बजावत आहे.
समाजात पती-पत्नी यांच्यात कौटूंबिक वाद आणि कलह निर्माण होऊन याचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या कुटुंबासह,मुले आणि समाजात होत असतो.अशा प्रकाराने पीडित व्यक्तींना समाजात वावरताना अनेक अडचणींनीचा सामना करावा लागतो. यासाठी पोलीस विभागात भरोसा सेलच्या माध्यमातून अशा विभक्त राहणाऱ्या दाम्पत्यांना या सेलमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते.आणि त्यांच्यात समझोता करून पुन्हा संसारात गुण्यागोविंदाने नांदण्यास मदत केली जाते.कर्जत उपविभागातील अशा लोकांनी कर्जत येथील भरोसा सेलशी संपर्क साधावा.
अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक, कर्जत विभाग