हडपसर – १४ नोव्हेंबर; प्रतिनिधी – डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून सांस्कृतिक विभागामार्फत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे साहेब उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले पंडित पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाचे आदर्श नागरिक होतील. अशा विचाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लहान मुलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. २७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. लहान मुलांचे लाडके ‘चाचा’ नेहरू यांना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी १४ नोव्हेंबर रोजी भारतात ‘बालदिन’ साजरा करायला सुरुवात झाली. ‘बालदिना’च्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा. यासाठी या दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करावे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय जडे, डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. सुनील खुंटे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.