कर्जत : अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि.२६ रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर साळुंके यांच्या समर्थकांनी कर्जत व तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत साळुंके कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव झाला होता. मात्र हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण मतदानाच्या अगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपून राहिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील एका कार्यक्रमात गद्दारी केलेल्या कर्जत तालुक्यातील स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
विजयाची खात्री असतानाही पराभवासाठी अप्रत्यक्षपणे घडवून आणलेल्या घडामोडींनी आ.रोहित पवारांचीही निराशा झाली. एकाच गोटात राहून घडलेला सर्व नाट्यमय प्रकार पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाळासाहेब साळुंके यांना निवडीबाबत शब्द दिला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देत ‘तज्ञ संचालक’ म्हणुन निवड करत त्यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला.
खऱ्या अर्थाने त्यांनी साळुंके यांना न्याय देऊन महाविकास आघाडी अधिक भक्कम केली आहे.महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही साळुंके यांच्या निवडीसाठी आग्रही भूमिका घेतली होती.कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी पाठपुरावा करून साळुंके यांची निवड निश्चित केली.असे असले तरी साळुंके यांच्या प्रामाणिक भुमिकेला आ.रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य न्याय मिळवून दिला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रामाणिकपणे केलेल्या कामाला योग्य न्याय!
‘तज्ञ संचालक’ म्हणुन निवड केली त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,आ.रोहित पवार यांचे आभार मानतो.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने योग्य न्याय मिळवून दिला याचे खुप समाधान वाटते.असे मत नुतन तज्ञ संचालक बाळासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.