- सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीचा प्रताप
- भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडून पर्दाफाश
रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती भाजपा नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe) यांनी आज पत्रकार परिषदेत चव्हाट्यावर आणली आहे.
महापालिका ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच नगरसेवक कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी उघड केला होता. संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर केल्याचे पुराव्यानिशी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होती. तसेच, महापालिका दक्षता समिती काय तपास करते? असा सवालही कामठे यांनी उपस्थित केला होता. मात्र, अद्याप महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
दरम्यान, सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीकडून बोगस बँक गॅरंटी सादर केल्याचे समोर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मुंबई येथील फोर्ट शाखेचे बँक मॅनेजर उल्गनाथन व्ही. यांनी तसे लेखी पत्र नगरसेवक कामठे यांना दिले आहे. BG nos. SBILG00004731679020 आणि SBILG00004731679019 हे दोन्ही बँक गॅरंटी बनावट असून, असे कोणतेही बँक गॅरंटी बँक प्रशासनाने दिलेले नाहीत, असा लेखी खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने महापालिका प्रशासनाची मोठी फसवणूक केली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
महापालिका आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी
इंदापूर नगर परिषद, तुळजापूर नगर परिषदेचे बनावट कार्यादेश, बोगस स्वाक्षरी करुन करुन सादर केल्याचे पुरावे महापालिका सर्वसाधारण सभेत सर्व नगरसदस्यांसमोर सादर केले. त्यानंतर आता संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने बोगस बँक गॅरंटी सादर करुन प्रशासनाची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. आता महापालिका प्रशासन आणि आयुक्त राजेश पाटील यांनी कायदेशीर कारवाई करावी आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तुषार कामठे यांनी केली आहे.
फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?
सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशातून राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीची कामे एखादी कंपनी राजकीय व्यक्तीच्या वरदहस्ताखेरीज करु शकत नाही. पुरावे सादर करुनही प्रशासन कारवाई करीत नाही, ही पिंपरी-चिंचवडकरांची फसवणूक आहे. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित संस्थेने सादर केलेली बनावट कागदपत्रे, बोगस स्वाक्षरी आणि आता बोगस बँक गॅरंटीसंदर्भातील पुरावे आम्ही पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे सादर करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी करणार आहोत, असेही नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे.
आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर विश्वास, तात्काळ गुन्हा दाखल करावा
सिक्युअर आयटी कंपनीने जमा केलेल्या इएमडी बद्दल मी वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील मला त्या देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. कारण, माझा स्पष्ट आरोप आहे की एका माजी महापौरांच्या अकाउंटवरून संबंधित इएमडी जमा झालेले आहे. मी मुंबई येथे एनआयसी मध्ये संबंधित इएमडी बद्दल माहितीची मागणी केलेली आहे. लवकरच ती मला मिळेल व त्या माजी महापौरांचे नाव लवकरच तुमच्या समोर उघड होईल. एसबीआय बँकदेखील सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. अशा प्रकारच्या किती बोगस बँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केलेले आहेत त्याची देखील माहिती मी आयुक्तांना विचारणार आहे व त्याची देखील अशाच प्रकारची शहानिशा करणार आहे. माझा माननीय आयुक्त व त्यांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तात्काळ या प्रकरणात ते फौजदारी गुन्हा दाखल करतील, अशी मला आशा आहे. जर का त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली किंवा विलंब केला तर महापालिकेचा विश्वस्थ या नात्याने मला देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याचा मी वापर करणार आहे, असा इशाराही नगरसेवक कामठे यांनी दिला आहे.