सातारा : कचरा उचलण्याऱ्या ठेकेदाराची डिपोझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या उपमुख्याधिकाऱ्यासह तीन निरिक्षकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने (एसीबीने) सोमवारी (ता. 8) कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ, वर्ग -२ (वय 33 वर्ष, सातारा नगरपरिषद रा. फोर्ट व्हिव्ह बी १3, १०० केसरकर पेठ सातारा, मूळ रा. रिया बी रायकरनगर धायरी, पुणे-४१), प्रविण एकनाथ यादव (वय ५१ वर्ष, आरोग्य निरीक्षक, रा . ३२२ धादमे कॉलनी, करंजे पेठ सातारा), गणेश दत्तात्रय टोपे (वय ४3 वर्ष, स्वच्छता निरीक्षक , रा .१२८ यादोगोपाळ पेठ सातारा), राजेंद्र कार्यगुडे (आरोग्य निरीक्षक रा .१७२ / २ एसटी कॉलनीचे पाठीमागे सातारा) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे यशश्री एंटरप्रायझेस सोलापूर या नावे सातारा शहरातील नगरपरिषदेचे प्रभाग निहाय कचरा उचलण्याचे ठेका आहे. या ठेक्यातील डिपोझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी आरोपींनी २, ३०,००० लाचेची मागणी केली. सापळा कारवाईमध्ये सातारा नगरपरिषद येथील उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी सातारा नगरपरिषद सातारा येथे त्यांचे केबिन समोरील कक्षामध्ये तक्रारदार यांचेकडून लाच स्विकारुन वैध परिश्रमिकाहुन अन्य पारितोषण म्हणून आर्थिक फायदा मिळविला म्हणून त्याचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, भष्ट्राचारासंबधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूद्ध तकार असल्यास 1064 किंवा 7875333333 संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.