मुस्लिम बांधवांच्या सहनशिलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये : सिद्दीकभाई शेख

मुस्लिम बांधवांच्या सहनशिलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये : सिद्दीकभाई शेख
  • कब्रस्तानचा प्रश्न सुटला नाही तर निवडणूकांवर बहिष्कार : हाजी गुलजार शेख
  • थेरगाव कब्रस्तानच्या मागणीसाठी शुक्रवारी मुस्लिम बांधवांचे महापालिकेवर तिरडी आंदोलन.

पिंपरी : मागील एकवीस वर्षांपासून कब्रस्तानचा प्रलंबित असणा-या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरातील बारा मस्जिद मधील नागरिक शुक्रवारी (दि. २५ मार्च) दुपारी ३ वाजता महापालिका भवनासमोर तिरडी आंदोलन करणार आहेत अशी माहिती कब्रस्तान संघर्ष समितीचे समन्वयक सिद्दीकभाई शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी (दि. २३ मार्च) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिद्दीकभाई शेख बोलत होते. यावेळी हाजी गुलजार शेख, मौलाना अलिम अन्सारी, इम्रान शेख, हाजी उस्मान शेख, अकबर शेख, हसन शेख, शब्बीर शेख, अय्युब इनामदार, मैनुउद्दीन शेख, अझहर पटेल, महंमद अन्सारी, आदिल शिकलगार, तहसीन खान, जमुद्दीन मुलानी आदींसह बारा मस्जिदीमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कब्रस्तान संघर्ष समितीचे समन्वयक सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले की, काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरातील मुस्लिम नागरिकांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी यासाठी कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने मागील २१ वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत पिंपरी चिचंवड महानगरपालिकेशी कब्रस्तान संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्याशी देखिल मागील सहा महिन्यांमध्ये दोन वेळा या विषयावर बैठका झाल्या. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. परंतू संबंधित विभागांचे अधिकारी मात्र मुस्लिम समाजाची आणि आयुक्त राजेश पाटील यांची दिशाभूल करीत आहेत. शहरी भागामध्ये मुस्लिम बांधवांना दफनभुमीसाठी जागा उपलब्ध करुन देणे हे कायद्यानुसार महापालिकेला बंधनकारक आहे. आजपर्यंत महापालिका प्रशासन याविषयी निव्वळ वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. आता मुस्लिम बांधवांच्या सहनशिलतेचा आणि संयमाचा अंत प्रशासनाने व आयुक्तांनी पाहू नये. आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासक या नात्याने स्वत:च्या अधिकारात काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरातील मुस्लिम नागरिकांना जागा उपलब्ध करुन द्यावी अशी कब्रस्तान संघर्ष समितीची प्रमुख मागणी आहे.


यावेळी हाजी गुलजार शेख यांनी सांगितले की, पिंपरी चिचंवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे कब्रस्तानच्या मागणीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही अनेकवेळा पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे आणि खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे यांना देखिल प्रत्यक्ष भेटून अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरातील सर्व नगरसेवकांना सुद्धा मुस्लिम बांधवानी दफनभूमीसाठी निवेदन देऊन मागणी केली आहे. २१ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची यापैकी कोणत्याही खासदार, आमदार, नगरसेवक आणि संबंधित अधिका-यांना इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांवर पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाज बहिष्कार टाकेल असा इशारा हाजी गुलजार शेख यांनी यावेळी दिला.


मौलाना अलिम अन्सारी यांनी सांगितले की, यापुर्वी महापालिकेने दिनांक २९/०/८/२०१६ रोजी महापालिका सभेत मुस्लिम समाजाला कब्रस्तान देणेकामी ठराव क्रमांक ९१५ नुसार मौजे रहाटणी येथील सर्व्हे क्रमांक ८३ मधील जागा आरक्षित करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. तसेच दि. ०८/०६/२०२० रोजी शहर सुधारणा समिती ठराव क्रमांक २१ नुसार थेरगाव येथील स्मशानभूमी शेजारील जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु दोन्ही वेळेस राजकीय नेत्यांच्या व प्रशासनच्या उदासीनतेमुळे मुस्लिम समाजाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे निलख, जगताप डेअरी, डांगे चौक, गुजरनगर या परिसरात एकूण बारा मस्जिद आहेत आणि मुस्लिम समाजाची साठ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. तसेच हे सर्व नागरिक महापालिकेला कर देत आहेत. आता पीसीएमसी स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटीच्या नावाखाली आणखी करवाढ करणार आहे. परंतू आम्हाला कब्रस्तानच्या न्याय हक्कांसाठी २१ वर्षांपासून झगडावे लागत आहे हे स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटीच्या प्रशासनाला शोभणारे नाही. महापालिका प्रशासनाच्या या हेकेखोरपणाचा सर्व मुस्लिम बांधव तीव्र निषेध करीत आहेत असे मौलाना अलिम अन्सारी यांनी सांगितले.


मुंबई महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३२० नुसार मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच कलम ३२१ नुसार कब्रस्तानसाठी भूखंड आरक्षित करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असतानासुद्धा मागील २१ वर्षांपासून मृतदेह दफन करण्याच्या मानव अधिकारापासून मुस्लिम समाजाला वंचित ठेऊन महापालिका प्रशासनाने मानवी हक्क व संरक्षण कायदा १९९३ चे उल्लंघन करीत आहे. कब्रस्तानची मागणी करूनही प्रशासन उदासीन असल्याने शेवटी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या संविधानिक अधिकाराचा वापर करून कलम १९ (१) ब प्रमाणे आमच्या मागणीसाठी शुक्रवार दि. २५ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनावर शांततेच्या मार्गाने व कायद्याचे पालन करीत तिरडी आंदोलन कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.