पुणे : वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागातील ठाणगाव येथे राहणाऱ्या नकुल शंकर पोळेकर याने १६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षा, २ मुलाखती दिल्या. तरीही पदरात अपयश पडत होते. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर यावेळी त्याला नायब तहसीलदार हे पद मिळाले आहे.
गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे नकुलचे प्राथमिक शिक्षण पानशेत जवळील रुळे या गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत त्याच्या मामाकडे झाले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण पुण्यात भारती विद्यापीठात झाले. पुढे पदवीचे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाले. पदवी झाल्यावर जवळपास ६ महिने त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी देखील केली. मात्र, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करावा आणि त्यातून प्रशासनात जाऊन प्रत्यक्ष लोकहितासाठी आपण अधिकारी म्हणून काम करावे असे त्याला सतत वाटत होते. शेवटी जून २०१६ ला निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.
स्पर्धा परिक्षेचा हा प्रवास सोप्पा कधीच नव्हता पण आई वडील, इतर सर्व कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांचा कायमच भक्कम आधार होता, त्यामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो आणि हा दिवस पाहू शकलो. अशी भावना नकुलने व्यक्त केली.
नकुलचे वडील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी मध्ये ‘लॅब अटेंडन्ट’ म्हणून कार्यरत आहेत, आई गृहिणी आहे. लहान भाऊ वाणिज्य शाखेतून पदवीधर होऊन सध्या नोकरी करत आहे. सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास केला. त्यामुळेच हे यश संपादन करता आले. आपल्या भागासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी पुढे काम करता येईन याचा मनस्वी आनंद आहे. असे तो म्हणाला.
स्वताच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा
जे माझे युवकमित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छितात, त्या सर्वाना एक सांगेन स्वतःवर आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा, खूप मेहनत घ्या, यश तुमचेच असेल. मी सर्व युवक मित्रांसाठी कायम उपलबद्ध असेल. मला ‘मांझी’ या चित्रपटातील एक डायलॉग कायम प्रेरित करत आला आहे,”छोडेंगे नही जबतक तोंडेंगे नही..” असे त्याने आवर्जुन सांगितले. तो पुढे म्हणाला की, वेल्हे तालुक्यातून अनेकजण प्रशासकीय सेवेतील महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे यश मला प्राप्त झाले.
वेल्हे तालुक्यातुन नकुल वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष किरण राऊत, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी नकुलचे अभिनंदन केले आहे.