आंद्रा धरण नोव्हेंबरपासून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणार; शंकर जगताप, महेश लांडगे, श्रीरंग बारणेंनी केली कामाची पाहणी

आंद्रा धरण नोव्हेंबरपासून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणार; शंकर जगताप, महेश लांडगे, श्रीरंग बारणेंनी केली कामाची पाहणी

पिंपरी, दि. १७ ऑक्टोबर २०२२ : पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावणारी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील पाणी आणले जाणार आहे. त्यातील आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध होणार आहे. या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी आणण्यात येणाऱ्या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप व भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टूगावर यांच्यासोबत सोमवारी (दि. १७) पाहणी केली.

आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी २६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी मंजूर झाले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत ८ हेक्टर परिसरात उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. केवळ दोन लाईन जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम ८ दिवसांतच होईल. येत्या १५ दिवसांत पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० दिवसांत निघोजेतून पहिल्या टप्प्यात ५० एमएलडी पाणी उचलले जाईल. त्यातून समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्त पाणी चिंचवडमधील वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेगुरव, रावेत या गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या भागाला दिले जाईल. त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.”

आमदार महेश लांडगे म्हणाले, “नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात निघोजेतून ५० एमएलडी पाणी उचलले जाईल. पुढील तीन महिन्यात आणखी ५० एमएलडी पाणी उचलण्यात येईल. त्यातून समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या भागाला पाणी मिळाल्याने शहराच्या उर्वरित भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पाण्याच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचे समाधान वाटते.”

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी पवना धरणाव्यतिरिक्त अन्य जलस्त्रोत निर्माण करणे काळाची गरज होती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. आंद्रा व भामा-आसखेड धरणातून शहरासाठी पाणी आणण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. कोविडमुळे दीड-दोन वर्षे प्रकल्पाचे काम संथ गतीने झाले. मात्र, आता लवकरच पिंपरी-चिंचवडकरांना आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ५० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावरील ताण कमी होणार असून, समाविष्ट गावांतील नागरिकांनाही दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.”