युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती

पिंपरी (प्रतिनिधी) , ५ नोव्हेंबर २०२३ – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांची प्रदेश सचिव पदी निवड करत पुणे ग्रामीण विभागाच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेत प्रदेश कार्यकारिणीने चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती केली आहे.


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू, सहप्रभारी एहसान खान, सहप्रभारी कुमार रोहित आणि प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे आणि विभागाच्या प्रभारींची यादी जाहीर केली.


चंद्रशेखर जाधव हे काँग्रेस पक्षाचा तरुण निष्ठावंत चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परिचित आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जाधव यांनी काँग्रेस पक्षाशी नाळ बांधली. पक्षाच्या वाईट काळातही जाधव यांनी निष्ठापूर्वक पक्षासोबत राहून पक्षसंघटन वाढीसाठी विविध अभियान राबविले. पक्षाच्या विविध आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवला. त्यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांसाठी व स्थलांतरित मजुरांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करून केलेले कार्य तर उल्लेखनीय होते.


त्यांच्या या निष्ठेची, कार्याची आणि प्रामाणिकपणाची दखल घेत पक्षानेही २०१६ मध्ये जाधव यांच्यावर चिंचवड विधानसभा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी त्यांनी काम पाहिले. प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक पदी काम करण्याचीही त्यांना संधी मिळाली. त्याचबरोबर त्यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.


या नियुक्तीबद्दल बोलताना चंद्रशेखर जाधव म्हणाले की, पूर्वीपासूनच पुणे ग्रामीण विभाग हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या विभागात कार्य करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्यच आहे. पक्षामध्ये निष्ठावंत युवकांची फळी तयार करण्यासाठी विशेष काम करणार असून येणाऱ्या निवडणुकीत हेच युवा कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद असतील, असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.