खड्डे खोदून ठेवले! आता अपघात होण्याची वाट पाहतेय का? महापालिका

खड्डे खोदून ठेवले! आता अपघात होण्याची वाट पाहतेय का? महापालिका

पिंपरी-चिंचवड, (बाळासाहेब मुळे) : मोशी जाधवाडी हाय स्ट्रीट मार्गावरती केबलच्या कामासाठी महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला मागील पंधरा दिवसांपासून जागोजागी खड्डे खोदून ठेवले आहेत. मात्र, रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. आता मोठा अपघात होण्याची महापालिका वाट पाहत आहे का? अशाच काहीशा प्रतिक्रिया देतांना रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक दिसत आहेत.

कारण त्या खड्ड्यामुळे फुटपाथवरून जाताना अबालवृद्धांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच या महत्त्वाच्या मार्गावर एका बाजूला पुणे जिल्ह्यातील मोठे भाजी मार्केट यार्ड आहे, तर दुसर्‍या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्जीबिशन सेंटरचे मोठे ग्राउंड आहे. त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूने फुटपाथ वरून येणाऱ्या जाणाऱ्यांची व रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते.

महापालिकेने रस्त्याच्याकडेला अनेक खड्डे खोदून ठेवले आहेत. परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांच्या बाजूने कोठेही बॅरिकेट्सची व्यवस्था केलेली नाही. एखादा मोठा अपघात होण्याअगोदर लवकरात लवकर हे खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.